कास पठार रस्त्यावर वाहनाच्या धडकेत भेकर ठार

पारंबे फाटा ते घाटाई फाटा दरम्यानची घटना; पर्यटकांना काळजी घेण्याचे आवाहन

by Team Satara Today | published on : 26 September 2025


सातारा  : जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावर भरधाव वाहनाच्या धडकेत भेकर हा वन्य प्राणी ठार झाल्याचे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम बहरात आला आहे. यामुळे पर्यटकांच्या वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. दरम्यान भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाच्या धडकेत भेकर ठार झाले. 

पारंबे फाटा ते घाटाई फाटा दरम्यान हा अपघात झाला. कास समितीचे वाहन गस्तीवर असताना भेकर मृतावस्थेत आढळून आले. यानंतर भेकराला कास समितीच्या वाहनातून सातारा वनविभागाच्या कार्यालयात आणले. यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी या भेकराचे शवविच्छेदन केले. अलीकडच्या काळात रस्ता ओलांडताना झालेल्या अपघातामुळे बिबट्यासह वन्यप्राणी मृत्युमुखी पडण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. याबाबत वाहन चालकांनी वन परिसरातून वाहन चालवताना वन्यप्राणी रस्त्यावर येत असतात. यावेळी काळजी घेण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.

वन्यप्राण्यांचा जीव देखील मोलाचा

कास पठार परिसरात रस्ते अपघातात यापूर्वीही अनेक वन्यप्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्याच्या पर्यटन युगात पर्यटनवाढ अपरिहार्य आहे. परंतु त्याच वेळी वन्यप्राण्यांचा जीव देखील मोलाचा आहे, याचा विसर पर्यटकांनी पडू देता कामा नये.

संदीप जोपळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, सातारा


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यासमोरच युवकांच्या गटात मारामारी
पुढील बातमी
बालक्रीडा स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास

संबंधित बातम्या