सातारा : युवक-युवतींनी भारतीय नौसेनेत अधिकारी व सैनिक म्हणून सहभागी व्हावे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांचा देदीप्यमान वारसा जपला जावा, या उद्देशाने वेस्टर्न नेव्हल कमांड (पश्चिम नौदल विभाग) मुंबईच्या वतीने ‘फ्लिट टू फोर्ट’ या दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीचे शुक्रवारी साताऱ्यात आगमन झाले असता सातारा जिल्हा माजी नौसैनिक संघटना आणि सातारा नेव्हल वेटरन्सच्या पदाधिकाऱ्यांनी सैनिक स्कूल येथे पुष्पगुच्छ व कंदी पेढे देऊन त्यांचे जंगी स्वागत केले.
पश्चिम नौसेना कमांडचे ठराविक अधिकारी, नौसैनिक व त्यांचे कुटुंबीय या रॅलीत सहभागी झाले आहेत. रॅलीचे नेतृत्व कराडचे सुपुत्र कॅप्टन शेखर देशपांडे करत आहेत. विशेष म्हणजे, पश्चिम नौसेना कमांडचे चीफ ऑफ स्टाफ व्हाईस ॲडमिरल राहुल गोखले यांच्या पत्नी तसेच नौसेना प्रमुख ॲडमिरल स्वामीनाथन यांच्या कन्या स्वतः या रॅलीत सहभागी झाल्या आहेत. हे पथक दोन दिवस साताऱ्यातील विविध शाळा, किल्ले व कास पठाराला भेट देणार आहे. यावेळी माजी नौसैनिक नगरसेवक शंकर माळवदे, सूर्यकांत पडवळ, अशपाक पटेल, राजू निकम, जीवन शिंगाडे, उमेश साळुंखे, श्रीकांत फाळके, सागर नेवसे, मंदार शेटे व सैनिक स्कूलचे प्राचार्य उपस्थित होते.
जलमंदिर निवासस्थानी सदिच्छा भेट
अभियानाच्या सदस्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या ‘जलमंदिर’ या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत या टीमने आपल्या पुढील प्रवासाला सुरुवात केली. वेस्टर्न नेव्हल कमांड ही भारतीय नौदलाची सर्वात महत्त्वाची आणि मुख्य लढाऊ कमांड आहे. याचे मुख्यालय मुंबईत असून, अरबी समुद्रातील भारताची संपूर्ण पश्चिम किनारपट्टी, प्रमुख बंदरे आणि सागरी सीमांच्या संरक्षणाची जबाबदारी या विभागावर असते. भारतीय नौदलाच्या प्रमुख युद्धनौका, विमानवाहू जहाजे आणि पाणबुड्या या कमांडच्या अंतर्गत कार्यरत असतात.
नौसिकांनी अनुभवला शूरांच्या जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा !, ‘वेस्टर्न नेव्हल कमांड’च्या दुचाकी रॅलीचे साताऱ्यात जोरदार स्वागत, जलमंदिर निवासस्थानी सदिच्छा भेट
by Team Satara Today | published on : 04 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा