सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील बहुतांशी भागात पावसाची उघडीप; पूर्वेकडे आजही प्रतीक्षा, कोयनेत ५१.७१ टीएमसी पाणीसाठा

by Team Satara Today | published on : 12 July 2026


सातारा : जिल्ह्याच्या पश्चिमेकडील बहुतांशी भागात पावसाची उघडीप असून, पूर्वेकडे मात्र आजही प्रतीक्षा आहे. तरीही पश्चिमेकडील धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने साठ्यात मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळच्या सुमारास कोयनेत ५१.७१ टीएमसी साठा झाला होता. तरीही धरण भरण्यास अजूनही ५३ टीएमसी पाण्याची गरज आहे. तर २४ तासांत नवजा येथे फक्त ८ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे.

जिल्ह्यात मागील आठवड्यात सर्वत्र पाऊस झाला. अधिक करून पश्चिम भागात पावसाचा जोर होता. कास, बाणमोली, तापोळा, कोयना, नवजा, जोर, महाबळेश्वर, पाथरपूंज आणि कांदाटी खोऱ्यात पावसाने थैमान मांडले होते. यामुळे रस्ते बंद झाले. घाटात दरडी कोसळल्या. जमिनीला भेगा पडल्या. परिणामी, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. पण दोन दिवसांपासून पावसाची उघडीप असल्याने परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. मात्र, अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने अनेक ग्रामस्थांचे स्थलांतर कायम आहे.

शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर नवजा येथे ८ आणि महाबळेश्वरला ७ मिलिमीटर पाऊस पडला. कोयना पाणलाेट क्षेत्रात पावसाची उघडीप असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे. सकाळच्या सुमारास २२ हजार ७६० क्युसेक वेगाने पाणी येत होते. तरीही धरणातील साठ्यात २४ तासांत सुमारे २ टीएमसीने वाढ झाली. त्यामुळे सकाळी साठा ५१.७१ टीएमसी झाला होता. ४९.१३ टक्के धरण भरले आहे. तसेच धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी या धरणांतही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला आहे.

सातारा शहरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची विश्रांती होती. नागरिकांना कधी सूर्यदर्शन घडले तर काहीवेळा ढगाळ वातावरण तयार होत होते. मात्र, पूर्व भागातील माण, खटाव, फलटण तालुक्यांकडे पावसाने पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.

जोरला ‘जोर’; २६४७ मिलिमीटर पाऊस 

जिल्ह्यात जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. त्या तुलनेत जून कोरडा गेला. तरीही १ जूनपासून आतापर्यंत महाबळेश्वरमध्ये २ हजार ३२९, कोयना १ हजार ४६० आणि नवजा येथे १ हजार ९१४ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे. तर वाई तालुक्यातील जोर येथे सर्वाधिक २ हजार ६४७ मिलिमीटर पाऊस पडला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कराडसह सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत किरपे गावच्या प्राची देवकर पटकावले कांस्यपदक
पुढील बातमी
फलटण तालुक्यातील वडजलजवळ वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा जीवघेणा हल्ला; दिंडी चालकाची ७० हजारांची लूट

संबंधित बातम्या