पालीच्या खंडोबा यात्रेसाठी एसटी सज्ज विविध आगारांतून १११ जादा बसेस; २ जानेवारी रोजी यात्रेचा मुख्य दिवस

by Team Satara Today | published on : 27 December 2025


सातारा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा सातारा विभाग पाल (ता. कराड) येथील खंडोबा यात्रेसाठी सज्ज झाला आहे. महामंडळाच्या विविध आगारांतून यात्रेसाठी १११ जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. या बसेसचा लाभ भाविक व प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

पाल खंडोबा यात्रा दि. १ ते ८ जानेवारीदरम्यान होत आहे. शुक्रवार, दि. २ जानेवारी हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. या यात्रेसाठी राज्यासह बाहेरील राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. यात्रा कालावधीत भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी महामंडळाच्या सातारा विभागातील ११ आगारांमार्फत जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. सातारा २०, कराड २५, कोरेगाव ७, फलटण ४, वाई ७, पाटण १०, दहिवडी ५, महाबळेश्वर ७, मेढा १०, पारगाव खंडाळा ४, वडूज ८ अशा मिळून १११ जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

कराड आगाराच्या आगार व्यवस्थापक शर्मिष्ठा पोळ या यात्राप्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. यात्रेसाठी पाल या ठिकाणी यात्रा शेडची उभारणी करण्यात आली आहे. यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जास्तीत जास्त प्रवासी वाहतूक करण्याच्या सूचना सर्व आगारप्रमुखांना वरिष्ठ कार्यालयामार्फत देण्यात आलेल्या आहेत. प्रवाशांनी महामंडळामार्फत जादा सोडलेल्या बसेसचा लाभघ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक ज्योती गायकवाड यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ग्रंथप्रदर्शने संमेलनाचे खरे वैभव : प्रा. मिलिंद जोशी; सातारा ग्रंथ दालनातील २४२ गाळ्यांची सोडत
पुढील बातमी
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा द्वितीय दीक्षांत समारंभ २९ डिसेंबरला; पद्मश्री प्रा. (डॉ.) जी. डी. यादव प्रमुख अतिथी

संबंधित बातम्या