सातारा : कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा या राज्य सार्वजनिक विद्यापीठाचा प्रथम दीक्षांत समारंभ बुधवार दि. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे आयोजित करण्यात आलेला आहे. हा समारंभ महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली होत असून, या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री व वित्त व नियोजन व राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलाधिकारी चंद्रकात दळवी यांनी दिली.
ते कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाने छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख, रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, विभागाचे सहसचिव बी. एन. पवार माध्यमिक विद्यापीठाचे प्र. कुलसचिव डॉ. विजय कुंभार, व परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्र. संचालक डॉ. हेमंत उमाप, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
रयत शिक्षण संस्थेने केलेल्या प्रस्तावानुसार कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा हे महाराष्ट्र शासनाने २७ ऑक्टोबर २०२१ रोजी स्थापित केलेले क्लस्टर विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियान अंतर्गत केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या शिफारशीनुसार स्थापन करण्यात आले. हे विद्यापीठ यशवंतराव चव्हाण इन्स्टट्यिूट ऑफ सातारा या महाविद्यालयाच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाविद्यालय, सातारा आणि धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, सातारा ही महाविद्यालये या विद्यापीठाची घटक महाविद्यालये आहेत.