सातारा : शहरालगतच्या सातारा-शेंद्रे रस्त्यावरील सोनगाव कचरा डेपोला सोमवारी दुपारी अचानक आग लागली. अज्ञाताने डेपो परिसरात वणवा पेटवल्याने ही आग पसरत गेली आणि धुराचे लोट हवेत पसरले. या धुरामुळे स्थानिक नागरिकांना आणि रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. सातारा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत ही आग आटोक्यात आणली.
नगराध्यक्ष अमोल मोहिते व आरोग्य सभापती धनंजय जांभळे यांनी संबंधित विभागाला आदेश देऊन यंत्रणा तत्काळ कार्यान्वित केली, ज्यामुळे मोठी वित्तहानी टळली. सातारा शहरालगतच्या डोंगर उतारावर मार्च महिन्यात सातत्याने वणवे लागण्याच्या घटना घडत आहेत. 'जुने गवत जळल्यास नवीन गवत येते' या चुकीच्या समजुतीतून अनेकदा जाणीवपूर्वक वणवे लावले जातात. यामुळे पक्षांचे अधिवास नष्ट होऊन वनसंपदेचे मोठे नुकसान होत आहे. मात्र, वनविभाग आणि सातारा नगरपालिका यांच्याकडून कठोर कारवाई होत नसल्याने हे प्रकार थांबायला तयार नाहीत. सोनगाव कचरा डेपोच्या पश्चिम बाजूला सकाळी ११:३० वाजल्यापासून धुराचे लोट दिसू लागले होते. सुरुवातीला नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ही आग विझवली होती, मात्र दुपारनंतर पुन्हा कचरा पेटवण्यात आल्याने आग अधिक पसरली. अजिंक्यतारा किल्ल्याची मागील बाजू आणि उंटाचा डोंगर परिसरातून हे धुराचे लोट स्पष्टपणे दिसत होते. सातारा-शेंद्रे रस्ता धुरामुळे पूर्णपणे अंधुक झाला होता.
नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तासाभरात ही आग विझवली. दरम्यान, वणवा लावणाऱ्या संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सोनगाव ग्रामस्थांकडून होत आहे. तसेच, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सोनगाव कचरा डेपो परिसर पूर्णपणे सीसीटीव्ही (CCTV) च्या निगराणीखाली असावा, अशी मागणीही यानिमित्ताने जोर धरत आहे.