सातारा : येथील समर्थ सदन येथे सुरू असलेल्या सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळने आपल्या अमृत महोत्सवीय सोहळा व शाकंभरी नवरात्र पर्वणी निमित्त आयोजित केलेल्या शतचंडी याग सोहळ्यामध्ये कुंकुमार्चन करण्यासाठी महिलांचा भूतपूर्व प्रतिसाद लाभला.
मंगळवारपासून सुरू झालेल्या या सोहळ्यामध्ये ललिता सहस्त्रनाम पठण करत सातारा शहर परिसरातील सुमारे 200 हून अधिक महिलांनी देवी मूर्तीला वैयक्तिकरित्या कुंकुमार्चन केले या कार्यक्रमासाठी वेदमूर्ती ओंकार शास्त्री बोर् व प्रसाद शास्त्री लिमये यांनी ललिता सहस्त्रनामाचे पठण केले.
सोहळ्यामध्ये आयोजित केलेल्या कीर्तन मालेत पुणे येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण संदीपबुवा मांडके यांनी शिव आणि शक्तीचा जागर काय आहे व शिव आणि शक्ती कशी अभिन्न आहे याचे सुरेख निरूपण केले. यावेळी मार्गदर्शन करताना मांडके बुवा म्हणाले की, हा यागसोहळा स्त्रीशक्तीचा जागर करणारा आहे. स्त्रीच्या मर्यादा समजून घ्यायला हव्यात शक्तीची मर्यादा ही शक्तीनेच सांगून दिली असून ती अमर्याद आहे शिव शक्ती विना अर्धा अधूरा आहे. शक्ती शिवाय विश्वाचे कल्याण शिव हा करूच शकत नाही .शक्तीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. पुरुषातही जी शक्ती असते तिला आपण ऊर्जा म्हणतो. शक्तीचा सदुपयोग ही होतो व दुरुपयोग ही होतो. गर्व ज्याच्या अंगी आहे तो शक्ती द्वारे विघ्न संतोषी काम करतो. मात्र अंगी अहंकार नाही असे उदाहरण म्हणजे पवनपुत्र हनुमान आणि समर्थ रामदास स्वामी.
समर्थांनी या शक्तीचा सदुपयोग करून संपूर्ण मानवी जीवन कसे असावे याबद्दल बहुमोल मार्गदर्शन दासबोधातून केले. शक्तीही संरक्षण करणारी ही असते आणि मारक ठरणारी ही असते. शक्ती आणि युक्ती ही विद्या उपयोगी केली तर जीवन समृद्ध बनेल. या कार्यक्रमास संवादिनीवर साथ बाळासाहेब चव्हाण यांनी केली तर तबला साथ विश्वनाथ पुरोहित यांची होती.
दरम्यान शतचंडी याग सोहळ्यात दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी सप्तशती स्तोत्राचे 50 पाठ 15 ब्रह्मवृंदांकडून करण्यात आले, तसेच शक्ती उपासना म्हणून यावेळी गोमाता पूजन व कुमारी यांचे पूजन करण्यात आले.
गुरुवार दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी सकाळी आठ ते साडेदहा या वेळेत श्री शतचंडी यागाचे उत्तरांग पूजन, बलिदान सोहळा, स्नान, यागाची पूर्णाहुती, दक्षिणाप्रदान, यजमानांना आशीर्वाद व सांगता होणार आहे. सकाळी साडेअकरा ते 12 या वेळेत वेदमूर्ती श्री विवेक शास्त्री गोडबोले यांचे समारोपाचे आशीर्वादपर प्रवचन होणार आहे.
या सोहळ्याच्या दर्शनासाठी सातारकरांची मोठी उपस्थिती असून पूर्णाहुति कार्यक्रमास तसेच या सोहळ्याच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समर्थ सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. सज्जनगड येथून श्री समर्थ सेवा मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक तसेच मंडळाचे खजिनदार अरविंद बुवा अभ्यंकर रामदासी, श्रीमती विद्याताई पुरोहित, दिनेशबुवा वैद्य रामदासी यांचेसह रमेश बुवा शेंबेकर, सातारा येथील समर्थ सदनचे व्यवस्थापक प्रवीण कुलकर्णी गुरुजी, शरदबुवा जठार, सौ. कल्पना ताडे, अनघाताई देसाई, संतोष वाघ, सुनील कुलकर्णी, राजू उर्फ मुरलीधर कुलकर्णी, अनिल प्रभुणे आदी कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत. समस्त सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी तसेच देवी भक्तांनी या शतचंडी यागाच्या सोहळ्यात तन-मन-धन अर्पून सहभागी व्हावे असे आवाहन श्री समर्थ सेवा मंडळाचे वतीने अध्यक्ष गुरुनाथ महाराज कोटणीस, कार्याध्यक्ष डॉ.अच्युत गोडबोले व कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी यांनी केले आहे.