सातारा : सत्यशोधक क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त लमाणवाडी, म्हसवे, ता.सातारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून महात्मा फुले युवा दल, सातारा जिल्हा यांच्यावतीने जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
त्यावेळी ॲड. धनंजय फरांदे, सातारा जिल्हाप्रमुख, महात्मा फुले युवा दल, म्हसवे गावचे सन्माननीय नागरीक रमेश उर्फ आबा शेलार, माजी उपसरपंच, म्हसवे ग्रामपंचायत, श्री. सचिन बनसोडे, उपजिल्हाप्रमुख युवक वंचित बहुजन आघाडी, सातारा जिल्हा, शाळेचे मुख्याध्यापक श्री. दोडमणी, महिला शिक्षिका सौ. साठे, शाळा सहाय्यक शेख उपस्थित होत्या.
यावेळी ॲड. धनंजय फरांदे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, चुल व मुल या संकल्पनेतून महिला वर्गाला बाहेर काढून शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी महात्मा फुले यांनी क्रांतिज्योती सावित्रीमाईंना प्रथम शिक्षण देवुन समाजातील मुंलीसाठी पहिली शाळा सुरु केली. व त्यानंतर शिक्षणामुळे समाजात झालेली क्रांतीची माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत येवून शिक्षण घेण्याची व शाळा न बुडवण्याची हमी दिली.
श्री. रमेश शेलार यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, या शाळेतील विद्यार्थी हे भविष्यात उच्च अधिकारी होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असून त्यांना कोणतीही अडचण आली तरी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या अडचणी सोडविणार.
यानंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. साठे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापक श्री. दोडमणी यांनी केले.