सातारा : सदरबाजार उत्तेकरनगर येथील द ग्रेट इंडियन कॅरव्हॅन नावाचे कंपनीचे ऑफिसमधून नरसिंहाचार रंगनाथाचार माधवाचार (रा. १६ स्वप्नपूर्ती विठ्ठलनगर, मु.पो. खेड ता. सातारा) यांनी फिर्यादी असलेले सेवानिवृत्त बिंदुमाधव वसंतराव कुलकर्णी (वय ६७ रा., बाळकृष्ण अपार्टमेंट १५९ मंगळवार पेठ, सातारा) यांच्यासह ६ जणांची तब्बल ५८ लाख ६५ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दि. ४ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलेल्या फिर्यादीनुसार नरसिंहाचार यांनी फसवणूक झालेल्या सहा जणांना भारतातील मोठ्या मोठ्या शहरातील पंचतारांकित आणि तीन तारांकित हॉटेलमधील पाच-पाच रूम एक वर्षासाठी भाड्याने घेतो आणि त्यातून दहा टक्के मला आर्थिक लाभ होतो. त्यामधील दोन टक्के मी तुम्हाला देईन असे सांगून सर्वांचा विश्वास संपादन करून जानेवारी २०२२ ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान वेळोवेळी ५८ लाख ६५ हजार रुपये घेतले.
सर्वांनी गुंतवलेले पैसे त्याचा नफा मागितला असता तो देण्यास नकार दिला तसेच गुंतवलेले पैशाची मागणी केली असता ते देखील न मिळाल्याने सर्वांची फसवणूक झाल्याची खात्री पटली. त्यानुसार, सातारा शहर पोलीस ठाण्यात कलम ४२० नुसार सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गवळी करत आहेत.