कराड शहर व परिसरात नोकरी लावण्याच्या आमिषाने अनेकजणांना गंडा घालणारा भामटा गजाआड; राजस्थान येथून अटक

by Team Satara Today | published on : 05 April 2026


कराड : कराड शहर व परिसरात नोकरी लावण्याच्या आमिषाने अनेकजणांना गंडा घालणाऱ्या भामट्यास कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने राजस्थान येथून ताब्यात घेऊन अटक केली.

पंकज बाबुलाल शर्मा (वय 35 रा. मूळ जशनगर ता. मेरठासिटी, जि. नागोर, राजस्थान) असे पोलिस कोठडी मिळालेल्याचे नाव आहे. कराड शहर व परिसरात नोकरी लावण्याच्या आमिषाने अनेकांना गंडा घातल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यापैकी काही घटना कराड शहर पोलिस ठाण्यात नोंद झाल्या आहेत. त्या अनुषंगाने डीवायएसपी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी या भामट्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या सूचना गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या.

गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निखील मगदूम हे मिळालेल्या माहितीच्या आधारे तीन दिवसापूर्वी आपल्या टीमसोबत राजस्थानला रवाना झाले होते. तेथे जाऊन त्यांनी फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयिताची माहिती गोळा करून तांत्रिक माहितीच्या आधारे त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्याला कराड येथे आणून कसून चौकशी केली असता त्यांने कराडसह परिसरातील अनेकजणांना नोकरी लावण्याच्या आमिषाने लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले. पंकज शर्मा हा मूळचा राजस्थानचा असून तो महाराष्ट्रात इचलकरंजी, पुणे आदी भागात वास्तव्यास होता. त्याने कराडसह इतर भागातही अनेकांना गंडा घातल्याची माहिती समोर येत आहे.

पोलिसांनी त्याच्याकडून काही प्रमाणात मुद्दल हस्तगत केली आहे. पोलिसांनी शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि. 7 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू असून यामध्ये आणखी काहीजणांचा समावेश आहे का?, अजून किती जणांना याने गंडा घातला आहे, आदी बाबींचा तपास सुरू आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पालखी महामार्गावर अपघातात काळजचे पती-पत्नी जागीच ठार; महामार्ग की मृत्यूचा सापळा ?
पुढील बातमी
पालकमंत्र्यांना त्यांची लोकं सांभाळता येत नाहीत, त्याला आम्ही काय करू?: ना. जयकुमार गोरे; आता राजकारण संपले, विकासाभिमुख राजकारणासाठी सर्वांना सोबत घ्यावे

संबंधित बातम्या