सातारा, दि. ११ : शिक्षण क्षेत्रातील नवनवीन प्रवाह विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणारे, समाजातील विविध घटकांना सातत्याने आधार देणारे, तसेच सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी कार्यरत असलेले प्रा. दशरथ सगरे यांचा व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल प्रा. अजिंक्य सगरे यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये सकल मराठा समाजाच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी मराठा क्रांती मोर्चा राजधानी साताऱ्याचे समन्वयक व पदाधिकारी उपस्थित होते. विविध मान्यवरांनी यावेळी प्रा. दशरथ सगरे सरांचे शैक्षणिक व सामाजिक योगदान अधोरेखित केले. प्रा. दशरथ सगरे यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी नेहमी नवनवीन संकल्पना पुढे आणल्या असून, त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ हजारो विद्यार्थ्यांना झाला आहे. त्याचबरोबर, समाजातील मागासवर्गीय व ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी घेतलेले प्रयत्न उल्लेखनीय असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
प्रा. अजिंक्य सगरे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत समिती सदस्यपदी निवड ही साताऱ्याच्या वैभवात भर घालणारी ठरल्याचे यावेळी वक्त्यांनी सांगितले. या निवडीबद्दल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांचेही आभार व्यक्त करण्यात आले. मराठी भाषेची परंपरा, समृद्ध साहित्य आणि पुढील पिढीला दिशा देण्याच्या प्रक्रियेत त्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी मराठा क्रांती मोर्चा राजधानी साताऱ्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी समाजाच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी सगरे परिवाराचे योगदान कौतुकास्पद असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला मराठा समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक, विविध संस्था, तसेच विद्यार्थी उपस्थित होते.