सातारा : माण तालुक्याचा विकास साधणे, दुष्काळ निर्मूलन करणे आणि तालुक्याच्या जनतेची अखंड सेवा करणे हेच माझ्या जीवनाचे ध्येय आहे. माण तालुक्याच्या जनतेने दाखविलेल्या विश्वासामुळेच आज मी मंत्रीपदावर पोहोचलो आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यप्रेरणेने पुढील काळात समाजहिताचे कार्य करत राहणार आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी केले.
म्हसवड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा संकल्प करण्यात आला असून, या पुतळ्याच्या सर्व खर्चाची जबाबदारी स्वतः स्वीकारणार असल्याची घोषणा मंत्री जयकुमार गोरे यांनी केली. या पुतळ्याच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, भाजप नेते शिवाजीराव शिंदे, डॉ. प्रमोद गावडे, इंजिनिअर सुनील पोरे, माजी नगराध्यक्ष सुरेश म्हेत्रे, तालुका अध्यक्ष प्रशांत गोरड आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री गोरे म्हणाले, माण तालुका हा कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात होता. परंतु गेल्या 15 वर्षांपासून केलेल्या अथक प्रयत्नांमुळे तालुक्याचा पाणी प्रश्न मोठ्या प्रमाणावर मार्गी लागला आहे. आता पुढील निवडणुका पाणी’ या मुद्यावर लढवाव्या लागणार नाहीत, अशी प्रतिज्ञा मी केली होती. आज तालुक्याचा चेहरा मोहरा बदललेला आहे. या बदलाचे श्रेय जनतेच्या अखंड पाठिंब्यालाच जाते.
अहिल्यादेवी होळकर या हिंदुहृदयसम्राज्ञी होत्या. त्यांनी 15 हून अधिक मंदिरे पुनरुज्जीवित केली. त्यांचे कार्य समाजाला दिशा देणारे आहे. त्यांच्या विचारांचे बीज जनमानसात पेरणे आणि ते प्रत्यक्ष कृतीतून दाखवून देणे हीच माझी खरी जबाबदारी आहे. विरोधक केवळ टीका करण्यात व्यस्त असतात, पण महान नेत्यांच्या विचारांचे आचरण मात्र ते करत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.
नामदार गोरे यांनी या कार्यक्रमात म्हसवड व माण तालुक्यासाठी अनेक विकास योजनांची घोषणा केली.
माण तालुक्याच्या जनतेच्या प्रेमामुळे मला सलग तीन वेळा आमदारकी व मंत्रीपद लाभले. हे ऋण मी कधीच फेडू शकत नाही. आगामी काळात शेतकरी व मेंढपाळांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे हेच माझे ध्येय राहील, असेही गोरे यांनी सांगितले.
यावेळी डॉ. वसंत मासाळ, डॉ. प्रमोद गावडे यांनी मनोगते व्यक्त केली. दोन चिमुकल्या मुलींच्या व्याख्यानाने या कार्यक्रमाला आणखी रंगत आणली होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन वसंत मासाळ यांनी केले.