वाईत पैशांच्या वादातून चाकू हल्ल्यात एक जण गंभीर जखमी; एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 20 May 2026


वाई : वाईत  रविवारी सायंकाळी पैशांच्या वादातून झालेल्या चाकूहल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला असून महिलांनाही दुखापत झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रशांत भगवान राजपुरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजेंद्र अपार्टमेंट, भीमकुंड आळी, रविवार पेठ, वाई येथे दि.१८ मे रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी अनिता श्रीनिवास शेलार (वय ४२, रा. रविवार पेठ, वाई) यांच्या घरी त्यांची बहीण रुपाली भगवान राजपुरे आंब्याचे लोणचे करण्यासाठी आली होती. त्यावेळी रुपाली यांचा मुलगा प्रशांत भगवान राजपुरे (वय २५, रा. कणूर, ता. वाई) याने फोनवरून आईकडे गाडी खरेदीसाठी पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास कामाच्या ठिकाणी येऊन चाकूने मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

फिर्यादीने त्याला आईशी अशा भाषेत बोलू नये, असे सांगितल्याने आरोपी संतप्त झाला. सुमारे अर्ध्या तासाने तो थेट फिर्यादीच्या घरी आला. “आमच्या दोघांमध्ये बोलणारी तू कोण?” असे म्हणत त्याने फिर्यादीवर धाव घेत मारहाण केली.यावेळी पती श्रीनिवास वामन शेलार हे सोडविण्यासाठी मध्ये आले असता आरोपीने त्यांनाही मारहाण केली व सोबत आणलेला चाकू काढून त्यांच्या पोटावर व पाठीवर वार केले. या हल्ल्यात श्रीनिवास शेलार गंभीर जखमी झाले. तसेच फिर्यादी व त्यांच्या बहिणीच्या हातावरही चाकूने वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणी फिर्यादी अनिता शेलार यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी प्रशांत राजपुरे याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाळुंज करत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भाजपकडून सुनील काटकर यांना विधान परिषदेची उमेदवारी द्या; खा. उदयनराजे भोसले समर्थकांची मागणी ; मुख्यमंत्र्यांना भेटणार
पुढील बातमी
हद्दपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी शाहूपुरीत दोघांना अटक; पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

संबंधित बातम्या