सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर वाई तालुक्यातील कवठे गावच्या हद्दीत कुरिअर कंपनीच्या पिकअप गाडीला अडवून कोयत्याचा धाक दाखवत सोन्या-चांदीचे दागिने आणि चांदीच्या विटा लुटल्याची धक्कादायक घटना घडली होती. या धाडसी दरोड्याचा सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि भुईंज पोलिसांनी अवघ्या १२ तासांत छडा लावत आठ आरोपींना जेरबंद केले. पोलिसांनी १ कोटी ५५ लाख २७ हजार २५८ रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व चांदीच्या विटा हस्तगत केल्या आहेत. या कारवाईमुळे दरोड्याच्या गुन्ह्याचा जलद तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे.
या दरोडा प्रकरणाची माहिती पोलीस उपअधीक्षक विपुल पाटील आणि वाई विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुनील साळुंखे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
दिनांक १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मार्क एक्सप्रेस कुरिअर कंपनीची महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने जात होती. यावेळी आठ आरोपींनी तीन मोटारसायकलींवरून खेड शिवापूर आणि कापुरहोळ येथून या गाडीचा पाठलाग केला. कवठे गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर पिकअपला मोटारसायकल आडवी मारून गाडी थांबवण्यात आली. त्यानंतर चालकाला कोयत्याचा धाक दाखवून शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करण्यात आली. पिकअपचा मागील दरवाजा उघडून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने आणि चांदीच्या विटा असलेले पोते जबरदस्तीने लुटून आरोपी पसार झाले होते. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि पोलीस उपअधीक्षक विपुल पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला गती देण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या नेतृत्वाखाली विविध तपास पथके तयार करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू करण्यात आला.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मंगेश एकनाथ जाधव, ऋतिक रमेश कदम, सोमनाथ प्रमोद गोडसे आणि त्यांच्या साथीदारांच्या संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आठ संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान कुरिअर कंपनीत काम करणाऱ्या गोपीनाथ तानाजी कदम याला पिकअप गाडीच्या वाहतुकीच्या वेळा आणि त्यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने असल्याची माहिती होती. त्याने ही माहिती साथीदारांना दिल्यानंतर दरोड्याचा कट आखण्यात आल्याचे तपासात समोर आले.
या प्रकरणात गोपीनाथ तानाजी कदम, मंगेश एकनाथ जाधव, ऋतिक रमेश कदम, आदित्य हणमंत कदम, सोमनाथ प्रमोद गोडसे, निखिल दिलीप कदम, अक्षय शांताराम मोझर (सर्व रा. मालगाव, ता. जि. सातारा) आणि निषिध शरद साबळे (रा. शिवथर, ता. सातारा) या आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दरोड्यात लुटलेले १ कोटी ५५ लाख २७ हजार २५८ रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि चांदीच्या विटा हस्तगत करण्यात आल्या आहेत.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, पोलीस उपअधीक्षक विपुल पाटील आणि वाई विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूनम झगडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, भुईंज व वाठार पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
भुईंज दरोड्याचा १२ तासांत छडा! आठ दरोडेखोरांना अटक; १ कोटी ५५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पोलीस उपअधीक्षक विपुल पाटील व सुनील साळुंखे यांची पत्रकार परिषदेत माहिती
by Team Satara Today | published on : 18 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा