सातारा : समन्वय बैठकीसाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करायची आणि पालकमंत्र्यांनी बैठक बोलल्यावर भाजपच्या नेत्यांनी यायचे नाही यायचे नाही. याचे आम्हालाच आश्चर्य वाटते. नगरपालिका निवडणुकांच्या वेळी सुद्धा हाच अनुभव आला होता, त्यामुळे पुढची भूमिका आता शिवसेनेला घ्यावी लागेल. पाटण तालुक्यातील जनता जयकुमार गोरे यांच्या कोणत्याही पॅकेजला भुलणार नाही, असा जोरदार पलटवार जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केला.
जयकुमार गोरे यांनी साताऱ्यात पालकमंत्री कोणी असो पाटण तालुक्याला निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा घणाघात करून पालकमंत्र्यांना आव्हान दिले होते. या आव्हानाला शंभूराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन लगेच प्रत्युत्तर दिले. त्यामुळे जिल्ह्यात महायुतीच्या घटक पक्षांमध्ये अंतर्गत मतभेद वाढल्याचे पुन्हा दिसून आले.
शंभूराज देसाई म्हणाले, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सातारा जिल्ह्यातल्या निवडणुकीसंदर्भात महायुती करायची असेल तर पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा आणि पालकमंत्र्यांनी बैठक बोलावली की त्या बैठकीला भाजपच्या नेत्यांनी दांडी मारायची. त्यानुसार मी जिल्ह्यातील आठही आमदार आणि दोन्ही खासदार यांना बैठकीत निमंत्रण दिलं होतं. मात्र आम्हालाही आश्चर्य वाटलं भाजपचे आमदार आणि दोन्ही मंत्री जिल्ह्यात असून सुद्धा ते बैठकीला आले नाहीत. पाठीमागचा अनुभव आमच्या गाठीशी आहे त्यामुळे आम्हाला शिवसेना म्हणून पुढची भूमिका घ्यावी लागेल.
शंभूराज देसाई पुढे म्हणाले, समन्वय बैठकीसाठी आवाहन करायचे आणि युती मधल्या जबाबदार मंत्र्यांनी पाटण मतदारसंघाबाबत वक्तव्य करायचे पालकमंत्री कोणी असू देत आपल्याला फरक पडत नाही. हे वक्तव्य जयकुमार गोरे यांनी केला असेल तरी याचा फरक पडतो की नाही पडत हे पाहण्यासाठी जिल्हा परिषदेचे घोडे मैदान लांब नाही. मला त्यांच्यासारखी अहंपणाची किंवा डोक्यात सत्ता गेल्यासारखी भाषा करायची नाही आणि मी करणार नाही त्यांनी डबल पॅकेज द्यायचं काय हे त्यांचं त्यांनी ठरवावे असल्या कुठल्याही पॅकेजला मतदारसंघातील आमची जनता भुलणार नाही. पाटणकरांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या गटातील 102 गावातील 1966 कार्यकर्त्यांनी जाहीरपणे शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे अशा पॅकेजची भाषा पाटण मतदारसंघाला लागू होणार नाही असा जोरदार प्रतिवाद देसाई यांनी केला.