सातारा : कराड शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस काॅन्स्टेबल आशुतोष अजित माने (वय २५, रा. टेलिफोन एक्स्चेंज पाठीमागे, कडेपूर, ता. कडेगाव) यांनी सांगली जिल्ह्यातील कडेपूर येथे मंगळवार, दि. २३ रोजी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे कराडसह कडेगाव तालुक्यात खळबळ उडाली. त्यांनी कोणत्या कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले, हे अद्याप समोर आलेले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी, आशुतोष माने हे कराड शहर पोलिस ठाण्यात कार्यरत होते. शांत, मनमिळावू व कर्तव्यदक्ष स्वभावामुळे त्यांची सहकारी आणि मित्रपरिवारात चांगली ओळख होती. सोमवारी ते सुटी घेऊन गावी गेले होते. दरम्यान, मंगळवारी पहाटे कडेगावमधील राहत्या घराजवळील जनावरांच्या शेडमध्ये त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, कडेगाव येथे नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, कडेगाव पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा करून अन्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून आत्महत्येमागील कारणांची माहिती पोलिस घेत आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तरुण वयातील पोलिसाने टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त होत आहे. कडेगाव पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण जाधव हे करीत आहेत.