सातारा : महामानवांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम राबवणे बाबत व त्यांकरीता लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करणेबाबतचे निवेदन नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष दत्ता बनकर यांच्याकडे आंबेडकर कार्यकर्त्यांनी देऊन इतरही प्रलंबित बाबीवर सकारात्मक सविस्तरपणे चर्चा केली. यावेळी नगरसेवक सागर पावसे, अविनाश कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
सालाबाद प्रमाणे दि. ११ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान राष्ट्रपीता महात्मा ज्योतीबा फुले यांची ११ एप्रिल व चक्रवर्ती सम्राट अशोक यांची १२ एप्रिल व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात साजरी करण्यात येत असते.तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर वगळता इतर महामानवांचे पुतळे नगरपरिषदेच्या हद्दीत नसल्याने इतर महामानवांच्या जयंत्या याच परिसरात साजऱ्या करण्यात येतात. त्याकरीता पुतळ्यासमोरील डाव्या बाजूस रस्त्याच्या कडेला १०/१५ चे सुशोभित असे स्टेज व मंडप प्रतिमा पूजनासाठी १० तारखेपासून उपलब्ध करून मिळावे.
सालाबाद प्रमाणे पुतळा परिसरात व सातारा शहरातील मुख्य रस्त्यावर कमानी व झालरी लाऊन सुशोभिकरण करण्यात यावे. याशिवाय, आपण भीम गीतांचा कार्यक्रम राबवतो. पण या वर्षी गायनाच्या कार्यक्रमाऐवजी लेखक दिग्दर्शक - अरुण राधायण व निर्माती पुनम प्रितेश मांजलकर यांचे 'महानाट्य महाभिज्ञा यशोधरा' हे नाटक गांधी मैदान अथवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जनतेला पाहण्यासाठी ठेवण्यात यावे. अशा आशयाचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी बी.एल. माने, गणेश कारंडे, चंद्रकांत खंडाईत, माणिक आढाव, अंकुशभाऊ धाइंजे, आबा मुळीक,विशाल भोसले व अनिल वीर उपस्थित होते.