बामणोली : सातारा जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम व संपर्कापासून कोसो दूर असलेल्या कांदाटी खोऱ्यात चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील गावे पुरती भेदरली आहेत. सततच्या अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी मोठमोठी झाडे व दरडी कोसळल्या असून रस्ते आणि काही पूलही खचले आहेत. परिणामी कांदाटी खोऱ्यातील तब्बल १६ गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
शिंदी, वलवण, चकदेव, आरव, पर्वत, मोरणी, म्हाळुंगे, उचाट, सालोशी, कांदाट, बन, वाघावळे, लामज, निवळी, आकल्पे आणि पिंपरी या गावांतील भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक आव्हानांचा सामना करत केलेली भातलागवड पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेली असून अनेक ठिकाणी शेतीमध्ये गाळ साचल्याने हंगाम धोक्यात आला आहे.
दरम्यान उचाट–शिंदी–रघुवीर घाट मार्गावर अनेक ठिकाणी दरडी आणि झाडे कोसळल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून वीजपुरवठा आणि मोबाईल नेटवर्कही खंडित असल्याने नागरिकांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे कांदाही खोऱ्यातील समस्यांमध्ये अधिकच भर पडली आहे.
नागरिक आणि पर्यटक अडकले..
मुंबईहून लामज येथे बाराव्याच्या कार्यक्रमासाठी आलेले सुमारे ६० ते ७० नागरिक तसेच पुण्यातील काही पर्यटक रघुवीर घाट व उचाट रस्तेमार्ग बंद झाल्यामुळे कांदाटी परिसरात अडकून पडले आहेत. प्रशासनाने तातडीने रस्त्यांवरील दरडी आणि पडलेली झाडे हटवून वाहतूक पूर्ववत करावी, अशी मागणी होत आहे.
मुसळधार पावसामुळे मोरणी–शिंदी-रघुवीर घाट मार्गावरील काही रस्ते आणि लहान पूल खचल्याच्या घटना समोर येत आहेत. यापैकी काही कामे नुकतीच पूर्ण झाली होती, तर काही अद्याप अपूर्ण आहेत. पहिल्याच पावसात या कामांचे नुकसान झाल्याने बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती व चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.