कोरेगाव : कोरेगाव मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी सत्तेचा वापर जनतेवर दडपशाही, दादागिरी करण्यासाठी केला आहे. ऐन हंगामात या भागातील पाण्यावाचून शेतकर्यांचे नुकसान केले. त्यामुळेच आता जनतेने निवडणूक हातात घेऊन नवी क्रांती करत मतदारसंघातील गद्दार आमदारांना घरपोहोच करण्याचा संकल्प केला आहे, असे प्रतिपादन कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आ. शशिकांत शिंदे यांनी केले.
एकंबे (ता. कोरेगाव) येथे आ. शशिकांत शिंदे येथे आयोजित प्रचरसभेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार रामहरी रूपनवर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, अजित पाटील-चिखलीकर, राजाभाऊ जगदाळे, बाबासाहेब कदम, संतोष शेलार, ब्रम्हा जगदाळे, अमर बर्गे, अॅड. पांडुरंग भोसले, अॅड. नितीन भोसले, संजना जगदाळे,अॅड. जयवंतराव केंजळे, राजेंद्र शेलार, अविनाश फाळके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले, माझे कार्यकर्ते प्रचार करतात म्हणून येथील लोकप्रतिनिधी दबाव, दडपशाही करत त्यांचा ऊस जळतात. स्टेट्स ठेवले की मारहाण करतात, महसूल, पोलीस, अन्न औषध यंत्रणांचा वापर करून धाडी टाकतात ही लोकशाही आहे का? सुसंस्कृतपणाचा बुरखा पांघरून त्यांनी जनतेला वेठीस धरले आहे. गेल्यावर्षी येथील शेतकर्यांना शेतीच्या हंगामी पाण्यावाचून मुकावे लागले. तुम्ही माझ्याकडे या नाहीतर तुम्हाला पाणी देणार नाही अशी दमबाजी करून त्यांनी सत्तेचा शेतकर्यांसाठी नाही तर त्यांना मारण्यासाठी वापर केला. शेतकर्यांना त्यांच्या पाण्याचा अधिकार आहे की नाही? त्यामुळेच जनतेमधून उठाव होत आहे. मी कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आणि विरोधकांनाही आपलेसे केले, असेही ते म्हणाले. यावेळी रामहरी रूपनवर, जयवंतराव शिंदे, अजित पाटील - चिखलीकर, डॉ. सुरेशराव जाधव, अॅड. श्रीकांत चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.
सध्या या मतदारसंघात पक्षबदलूपणा, गद्दारी करून जनतेच्या स्वाभिमानाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला असल्यानेच या मतदारसंघातील दहशती विरोधात मी लढा देण्यासाठी मैदानात उतरलो आहे. सत्ता नसतानाही जनतेचा मला मिळत असलेला प्रतिसाद, आर्शिवाद हीच माझी उर्जा आहे. या मतदारसंघातील आमदारांच्या नाटकी, खोटारडे पणाला मुठमाती देऊन स्व. यशवंतराव चव्हाण, शरद पवार, स्व. शंकरराव जगताप यांच्या रचनात्मक विचारांचे पुनरूज्जीवन करणार आहे, असेही आ. शशिकांत शिंदे म्हणाले.