सातारा : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत सातारा विधानसभा मतदारसंघासाठी विशेष समाधान शिबिराचे आयोजन रविवार, दि. २६ जुलै रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. हे शिबिर विठ्ठल मंगलम मंगल कार्यालय, लिंबखिंड, ता. जि. सातारा येथे होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा प्रभारी आ.डॉ.नीलमताई गोऱ्हे तसेच जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने हे अभियान सुरू केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
या शिबिरामध्ये महसूल विभागासह विविध शासकीय विभागांच्या योजनांची माहिती, नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींचे निवारण, विविध दाखले, प्रमाणपत्रे तसेच अन्य शासकीय सेवांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आशिष बारकुल, उपविभागीय अधिकारी सातारा यांचे वतीने करण्यात आले आहे.