सातारा : गावाकडच्या बोलीभाषेत दडलेले शब्द म्हणजे आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा अनमोल ठेवा आहे. काळाच्या ओघात हे शब्द विस्मरणात जाऊ नयेत, नव्या पिढीलाही त्यांची ओळख व्हावी, या उद्देशाने गुरुस्पर्श एज्युकेशन, सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन, संभाजीनगर यांनी 'माझ्या गावाची शब्दसंपदा' हा राबवलेला अभिनव उपक्रम मराठी भाषा संवर्धनाच्यादृष्टीने मोलाचा आहे. या मायमराठीला समृध्द वारसा आणि अफाट शब्दसंपदा लाभली असून तिचा गोडवा जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी केले.
संभाजीनगर, ता. सातारा येथे गुरुस्पर्श फाउंडेशनच्या वतीने आयोजित दुर्गोत्सव २०२६ मध्ये हा प्रकाशन सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जि. प. सदस्य सौ. निता खरात, पं. स. सदस्य सौ. विजया साळुंखे, सरपंच सतीश माने, सदस्य अनिल पिसाळ, बाळासाहेब खरात, सागर साळुंखे, गोपाळराव खजुरे, शफी भाई सय्यद, संतोष बारटक्के आदी उपस्थित होते.
विनोद कुलकर्णी म्हणाले, मराठी भाषेला समृद्ध परंपरा आणि प्रचंड शब्दसंपदेचा वारसा लाभला आहे. आपल्या मातृभाषेचा प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे. ग्रामीण बोलीभाषेतील शब्द हे आपल्या जगण्याचे, संस्कृतीचे आणि पूर्वजांच्या अनुभवांचे प्रतिबिंब आहेत. ते जतन करून नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. जयवंतराव मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेला हा उपक्रम इतर मंडळांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.
राजधानी सातारा येथे नुकतेच दिमाखात पार पडलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वितेत ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनासह जयवंतराव मोरे यांच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान लाभले. त्यांच्या सहकार्यामुळे संमेलनाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडणे शक्य झाले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. गावोगावी मराठी भाषा पंधरवडा साजरा करण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
फाउंडेशनचे अध्यक्ष तथा उपक्रमाचे संकल्पक जयवंतराव मोरे यांनी प्रास्ताविकात या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. अभिजात मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी आणि तिचे संवर्धन करण्यासाठी सर्वांच्या सहकार्यातून ही पुस्तिका साकारण्यात आली आहे.
ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शुभसंदेश देऊन उपक्रमाला प्रोत्साहन दिले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी मार्गदर्शन करून उपक्रमाचे महत्त्व सांगितले. याबद्दल मोरे यांनी दोन्ही मान्यवरांचे आभार मानले.
या पुस्तिकेच्या निर्मितीसाठी विक्रांतनगर येथील जि. प. शाळाचे मुख्याध्यापक जोतिराम जाधव, संतोष बारटक्के, विजय कदम, अनिता पवार आणि प्रतिभा गायकवाड यांच्यासह शिक्षक व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. प्रकाशन समितीचे मार्गदर्शक गोपाळराव खजुरे, कल्याण भोसले, जीवनदास शहा, जगदीश भोसले, संतोष ओतारी, रमेश भिसे, तात्यासाहेब थोरात आणि महिलांची नवदुर्गा उत्सव समिती यांनीही पुस्तिका साकारण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
पुस्तिकेच्या निर्मितीसाठी जाहिरातदारांनी दिलेल्या आर्थिक योगदानाबद्दल जयवंतराव मोरे यांनी आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन कुलकर्णी यांनी केले. आभार तात्यासाहेब थोरात यांनी मानले.
गावोगावी जपली जाणार मायमराठीची शब्दसंपदा विनोद कुलकर्णी; 'माझ्या गावाची शब्दसंपदा' पुस्तिकेचे प्रकाशन
by Team Satara Today | published on : 25 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा