कृष्णा नदीचा उल्लेख नसताना वाईत लघु कुंभमेळा कशासाठी? आक्षेप नोंदवत संयोजकांनी यामागील भूमिका स्पष्ट करावी - विद्रोही सांस्कृतिक चळवळीची मागणी

by Team Satara Today | published on : 21 May 2026


सातारा : वाई येथे कृष्णा नदीकाठी आयोजित करण्यात आलेल्या लघु कुंभमेळ्याबाबत विद्रोही सांस्कृतिक चळवळीने तीव्र आक्षेप नोंदवत संयोजकांनी यामागील भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे. कृष्णा नदी पवित्र मानली जात असताना पारंपरिक सप्तगंगा मंत्रामध्ये तिचा उल्लेख नसल्याचा मुद्दा उपस्थित करत या मेळ्याच्या आयोजनामागे धार्मिक आणि राजकीय हेतू असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

कृष्णा नदीचे प्रदूषण होणार नाही याची खात्री संयोजकांनी द्यावी

विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष कॉ. धनाजी गुरव, सरचिटणीस डॉ. जालिंदर घिगे, प्रवक्ते कॉ. अविनाश कदम व विजय मांडके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, वाई ही धर्मसुधारकांची परंपरा असलेली भूमी असून येथे बाहेरून येऊन कर्मकांडांचा प्रचार करणे योग्य नाही. लघु कुंभमेळ्यामुळे कृष्णा नदीचे प्रदूषण होणार नाही याची खात्री संयोजकांनी द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

मेळ्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च होणार असल्याचा दावा 

मेळ्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च होणार असल्याचा दावा करत संघटनेने त्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महाप्रसाद, साधुसंतांची व्यवस्था, निवास, दक्षिणा, मिरवणुका, सोशल मीडिया प्रचार आदींसाठी होणारा खर्च वाया जाणारा असून त्यातून बेरोजगारी किंवा विकासाचे कोणतेही प्रश्न सुटणार नाहीत, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

धार्मिक आयोजनांवर होणारा मोठा खर्च टाळावा

लघु कुंभमेळ्याच्या काळात वाईतील मंडई व मासे विक्री बंद राहणार असल्याने शेतकरी व व्यावसायिकांचे नुकसान होणार असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. जागतिक मंदी, इंधन व गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर अशा धार्मिक आयोजनांवर होणारा मोठा खर्च टाळावा, अशी मागणी विद्रोही सांस्कृतिक चळवळीने केली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कॉकरोच जनता पार्टीला सातारा जिल्ह्यात प्रचंड प्रतिसाद; हजारो युवकांनी घेतले ऑनलाइन सदस्यत्व
पुढील बातमी
शेंद्रे येथे कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माजी सैनिकांचा २३ मे रोजी मेळावा

संबंधित बातम्या