मसूर : कराड तालुक्यातील हेळगाव येथे रस्त्याच्या वाटेच्या वादातून रविवारी दि.२० रोजी सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास दोन गटांत झालेल्या हाणामारीने गाव हादरले. कुराड, कोयता, लोखंडी टोचा आणि लाकडी दांडक्यांचा वापर झाल्याच्या आरोपांमध्ये सूरज भरत सूर्यवंशी (वय २८) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेत दोन्ही बाजूंचे मिळून अनेक जण जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर कृष्णा हॉस्पिटल कराड येथे असल्याची माहिती आहे. या प्रकरणी महिलांसह दहा जणांवर खुनासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर हेळगावमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (२०) सकाळी सव्वानऊच्या सुमारास हेळगाव येथील प्रज्वल किसन सूर्यवंशी यांच्या घरासमोर रस्त्याच्या वाटेच्या वादातून हा प्रकार घडला. प्रज्वल सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून मसूर पोलिस ठाण्यात श्रीमंत उर्फ उत्तम रामचंद्र सूर्यवंशी, आयुष सचिन उर्फ विठ्ठल सूर्यवंशी, ओंकार उत्तम सूर्यवंशी, सचिन उर्फ विठ्ठल रामचंद्र सूर्यवंशी, रामचंद्र महादेव सूर्यवंशी, रेश्मा सचिन उर्फ विठ्ठल सूर्यवंशी, सुनिता उत्तम सूर्यवंशी, तेजस्विनी संजय सूर्यवंशी, शालन रामचंद्र सूर्यवंशी आणि विद्या ओंकार सूर्यवंशी, सर्व रा. हेळगाव, ता. कराड, जि. सातारा, यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून व घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (२०) सकाळी सव्वानऊच्या सुमारास हेळगाव येथील प्रज्वल किसन सूर्यवंशी यांच्या घरासमोर रस्त्याच्या वादातून हा प्रकार घडला. फिर्यादीतील आरोपानुसार, श्रीमंत उर्फ उत्तम रामचंद्र सूर्यवंशी हा कुराड, आयुष सचिन उर्फ विठ्ठल सूर्यवंशी हा लोखंडी टोचा, ओंकार उत्तम सूर्यवंशी हा कोयता, तर सचिन उर्फ विठ्ठल रामचंद्र सूर्यवंशी आणि रामचंद्र महादेव सूर्यवंशी हे लाकडी दांडके घेऊन आल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यांच्यासह अन्य व्यक्तींनी एकत्र येऊन शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
फिर्यादीनुसार, घराशेजारील बाथरूममधून घरात येणाऱ्या सूरज भरत सूर्यवंशी याच्यावर हल्ला करण्यात आला. त्याचप्रमाणे, भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या व्यक्तींवरही कुराड, कोयता, दांडके आणि दगडांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत प्रज्वल किसन सूर्यवंशी, सौरभ भरत सूर्यवंशी, यश शशिकांत सूर्यवंशी, रेखा शशिकांत सूर्यवंशी आणि रोहिणी भरत सूर्यवंशी हे जखमी झाल्याची नोंद पोलिस दैनंदिनीत आहे.
दरम्यान, या घटनेत सूरज भरत सूर्यवंशी याचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या बाजूचेही दोघेजण जखमी झाल्याची माहिती असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या जखमींबाबतची सविस्तर माहिती आणि घटनेतील त्यांची भूमिका पोलिस तपासातून स्पष्ट होणार आहे. याच कुटुंबातील व्यक्तींमध्ये रस्त्याच्या कारणावरून जुना वाद होता मात्र, रविवारी सकाळी पुन्हा वाद उफाळून आल्याने त्याचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला.
मसूर पोलिसांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच मसूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, घटनास्थळी श्वान पथकही पाचारण करण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांनी मसूर पोलिस ठाण्यास भेट देऊन घटनेची माहिती घेतली.
रस्त्याच्या वाटेवरून सुरू झालेल्या वादाने रक्तरंजित वळण घेतल्याने हेळगावमध्ये खळबळ उडाली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी गावात बंदोबस्त वाढविला असून, या प्रकरणाचा पुढील तपास मसूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात करीत आहेत. दरम्यान मयत सुरज हा सोसायटीच्या सचिव पदी कार्यरत होता त्याच्या सुरज च्या मनमिळाऊ स्वभावामुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
परस्परविरोधी फिर्यादीची शक्यता
या घटनेत परस्परविरोधी फिर्याद दाखल होणार असल्याची माहिती असून, दुसऱ्या बाजूनेही पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या तक्रारी समोर आल्यानंतरच घटनेचा संपूर्ण तपशील स्पष्ट होणार आहे. सध्या दाखल झालेला गुन्हा हा प्रज्वल सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवर आधारित असून, त्यातील आरोपांची सत्यता तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
गणेशोत्सवाच्या आनंदावर काळोखाची छाया; आठ-दहा दिवसांत आठ ते दहा जणांचा मृत्यू
गणेशोत्सवाच्या उत्साहात असलेल्या हेळगाववर महिनाभरात दुःखाचे सावट आहे. या अल्पावधीत अपघात तसेच नैसर्गिक कारणांमुळे गावातील आठ ते दहा जणांचा मृत्यू झाला आहे. एकामागून एक घडलेल्या या दुःखद घटनांमुळे गावातील आनंदाचे वातावरण आधीच करपून गेले होते. त्यातच रविवारी घडलेल्या रक्तरंजित हाणामारीत सूरज भरत सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाल्याने हेळगावच्या जखमेवर पुन्हा घाव बसला आहे. गणरायाच्या आगमनाचा उत्सव साजरा करण्याऐवजी गावकऱ्यांवर वारंवार अंत्यविधीला उपस्थित राहण्याची वेळ येत असल्याने संपूर्ण हेळगाव शोकसागरात बुडाले आहे. प्रत्येक घरात हळहळ, प्रत्येक चेहऱ्यावर चिंता आणि गावभर अस्वस्थ शांतता असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
हेळगावात वाटेच्या वादातून रक्तरंजित थरार ! हाणामारीर जखमी सूरज सूर्यवंशीचा मृत्यू, दहा जणांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 20 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा