दहिवडी : दहिवडी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील मॉलसाठी लागणारे रॅक व इतर साहित्य होलसेलमध्ये पुरवणाऱ्या एका गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. लालसरे यांच्या मालकीच्या या गोडाऊनमध्ये आग लागल्याची माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. आगीची तीव्रता अधिक असल्याने मोठे नुकसान झाले असून, आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
घटनास्थळी उपस्थित स्थानिक तरुणांनी व दहिवडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी व पोलीस कर्मचाऱ्यांनी अत्यंत धाडसाने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. म्हसवड आणि वडूज येथून आलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी उर्वरित आग पूर्णपणे नियंत्रणात आणली. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि तातडीच्या मदतीमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला असून, आगीत झालेल्या नुकसानीचा नेमका आकडा तपासानंतर समोर येईल.
या दुर्दैवी घटनेनंतर दहिवडी शहरात अग्निशमन यंत्रणेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी यासाठी दहिवडी नगरपालिकेकडे स्वत:ची अग्निशामक दलाची गाडी असणे अत्यंत गरजेचे असल्याची मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.
दहिवडीत बाजार समिती परिसरात गोडाऊनला भीषण आगीत मोठे नुकसान; आग विझवण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांचे शर्तीचे प्रयत्न
by Team Satara Today | published on : 29 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा