सातारा : २०२६ या वर्षातील हिरवाई प्रकल्पाची ही रौप्यमहोत्सवी दिवाळी असून यावेळी हा दिवाळीचा उपक्रम तीन टप्प्यांत आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रकल्पाच्या प्रमुख प्रा. संध्या चौगुले यांनी दिली. हिरवाईच्यावतीने गेली पंचवीस वर्षे दिवाळीच्या आनंदाला सामाजिक जाणिवेची जोड देण्याचा प्रयत्न राहिला आहे.यावर्षीचा पहिला टप्पा म्हणून उद्या, शनिवार दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता सदरबाजार येथील 'हिरवाई' मध्ये मुलांची दिवाळी साजरी होईल.
दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांचा उत्सव न करता सामाजिक जाणिवा रुजवणे महत्त्वाचे वाटते. याच भूमिकेतून यंदा मुलांमध्ये 'प्रदूषणमुक्त, फटाकेमुक्त दिवाळीचे भान' निर्माण करण्याबरोबरच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा काटकसरीने व जबाबदारीने वापर करण्याविषयी जागृती करण्याचा प्रयत्न आहे, असे प्रा. चौगुले यांनी सांगितले.
त्यासाठी मुलांना आकाशकंदील तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. या आकाशकंदिलांवर पर्यावरण संवर्धन, पाणी बचत आणि प्रदूषणमुक्त दिवाळीचे संदेश लिहून मुलांच्या सर्जनशीलतेतून सामाजिक प्रबोधन साधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यानुसार शनिवारी सकाळी ८ ते ९.३० या वेळेत आकाशकंदील तयार करणे आणि संदेशलेखन प्रशिक्षण होईल. सकाळी ९.३० ते १०. ३० मुलांचा दिवाळी आनंदोत्सव होईल. यावेळी मुक्तागिरी मुक्तांगण सोशल फाउंडेशनच्या संचालिका सौ. अपर्णा अनिल देसाई प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत
या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे आणि हिरवाईच्या रौप्यमहोत्सवी दिवाळीचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन प्रा. संध्या चौगुले यांनी केले आहे.
'हिरवाई'च्या रौप्यमहोत्सवी दिवाळीचा शनिवारी उपक्रम; प्रदूषणमुक्त दिवाळीचा संदेश; सर्वांनी सहभागी व्हावे - प्रा. संध्या चौगुले
by Team Satara Today | published on : 16 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा