कोरेगाव : भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने एका वकिलाने बूट भिरकावल्याच्या घटनेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र, समाजभूषण संघाने निषेध करत संबंधित वकिलावर कडक कारवाईची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, की सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने राकेश किशोर या वकिलाने बूट भिरकावला आहे. हा प्रकार शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या, देशामध्ये संविधात्मक न्याय पालिकेच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून ओळखला जाईल. या देशात हजारो वर्षे ज्या समाजाला सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिकदृष्ट्या वंचित ठेवले, अशाच समाजात जन्माला आलेले;
परंतु आपल्या बुद्धिकौशल्य व कार्यकतृत्वाने सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्याधीशपदी विराजमान असलेले भूषण गवई यांची ही प्रतिमा एका वकिलाने मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. या देशात जातीयवाद पेटावा, अराजकता माजावी व कायमस्वरूपी आम्हीच या देशाचे मालक असावे, अशा देशद्रोही विचारांच्या जातसमूहाचा हा एक घटक आहे. त्याने केलेल्या या भ्याड कृत्याचा निषेध करण्यात आला.
निवेदनावर संघाचे सातारा जिल्हाध्यक्ष सुरेश येवले, उपाध्यक्ष बापूराव जगताप, सरचिटणीस जयसिंग चव्हाण, राज्य कार्यकारिणी सदस्य शीला गीते, कार्याध्यक्ष विश्वनाथ शिंदे, ज्येष्ठ सदस्य विजय शेलार, ज्येष्ठ सल्लागार प्रा. मारुती ढोले, सदस्य विजय गायकवाड, तुकाराम कांबळे यांच्या सह्या आहेत.