मुंबई : बदलापूरमधील दोन अल्पवयीन अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यात राजकारण तापले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी ठाणे पोलिसांनी एसआयटी स्थापन केली असून ही एसआयटी डीसीपींच्या नेतृत्वाखाली तपास करणार आहे. अक्षय शिंदे याने पोलिसांवर गोळी झाडली. त्यानंतर स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला. दरम्यान या प्रकाराविरुद्ध अक्षयच्या आई-वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली.
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात त्याच्या आई-वडिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर आज हायकोर्टात न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी सरकारी वकिलांनी सरकारची बाजू हायकोर्टात मांडली. एन्काऊंटर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने काही प्रश्न उपस्थित केले.
युक्तिवाद झाल्यानंतर हायकोर्टाने सरकारी वकिलांवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. हा एन्काऊंटर होऊच शकत नाही. या प्रकरणातील फॉरेन्सिक रिपोर्ट कोर्टात सादर करावा अन्यथा आम्हाला वेगळी पावले उचलायला लागतील, अशा गंभीर इशारा हायकोर्टाने दिला आहे. आरोपीच्या डोक्यात का गोळी मारली? पोलीस डोक्यावर की पायात गोळी मारतात? सामान्य व्यक्ती बंदूक चालवू शकतो का? चार पोलीस एका आरोपीला सांभाळू शकत नव्हते का? जे पोलीस अधिकारी जखमी झाले त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र मानवाधिकार आयोगाकडे सादर करावे. या घटनेतील संबंधित अधिकारी कोर्टात आहेत का? असे अनेक प्रश्न हायकोर्टाने उपस्थित केले आहेत. चुकीची माहिती सादर करू नये, अन्यथा गय केली जाणार नाही, अशा इशारा हायकोर्टाने दिला आहे.
आमचा पोलिसांवर संशय नाही, पण योग्य चौकशी होईल हवी, असे मत हायकोर्टाने मांडले आहे. सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवावे आणि ते असेल अशी आमची अपेक्षा आहे. आजच्या आणि पुढच्या सुनावणीत फरक दिसल्यास वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल असे स्पष्ट मत हायकोर्टाने मांडले आहे.
अक्षय शिंदे एन्कांऊटरप्रकरणी ठाणे पोलिसांनी मंगळवारी (२४ सप्टेंबर) पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ठाणे पोलीस स्थानकातील वरिष्ठ पोलीस अधिकारी शैलेश साळवी यांनी सोमवारी घडलेल्या घटनेचा घटनाक्रम सांगितला आहे. बदलापूरचे पोलीस अक्षय शिंदेला कायदेशीर पद्धतीने घेऊन जात असताना, अक्षयने पोलिसांची पिस्तुल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच यावेळी त्याच्याकडून पोलिसांवर जीवघेणा हल्ला करण्याचा देखील प्रयत्न झाला आहे. या संदर्भात मुंब्रा पोलीस स्थानकात 307 कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच १३२ /१०९ /१३१ अन्वये देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय शिंदेसंदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास ठाणे पोलीस आयुक्त करत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे.