सातारा : भाजप नेते आणि महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांना यशवंत सहकारी बँकेच्या 112 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांना कराड न्यायालयात हजर केले असता त्यांना पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश यु. एल. जोशी यांनी दि. 2 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सातारा जिल्ह्यातील फलटण येथील यशवंत सहकारी बँकेत तब्बल ११२ कोटी १० लाख ५७ हजार रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका चरेगावकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांना आज 25 रोजी पहाटेच्या सुमारास आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक इनामदार यांनी त्यांच्या घरातून अटक केली. या घोटाळ्याप्रकरणी शेखर चरेगांवकर यांच्यासह बँकेचे संचालक, अधिकारी आणि नातेवाईक अशा एकूण ५० जणांविरुद्ध कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासात असे समोर आले आहे की, २०१४ ते २०२५ या कालावधीत सुमारे १९५ बोगस कर्ज खाती उघडून, कोणतेही तारण न घेता आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधी रुपयांचा अपहार करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. तसेच, डिसेंबर २०२५ मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ED) या घोटाळ्याप्रकरणी बँकेच्या शाखांवर आणि चरेगांवकर यांच्या नातेवाईकांच्या निवास्थानी छापेमारी केली होती.
शेखर चरेगांवकर यांनी यापूर्वी अटक टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता.
चरेगावकर यांना अटक केल्यानंतर कराड न्यायालयात हजर केले असता पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश यु. एल. जोशी यांच्यासमोर सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पुष्पा जितेंद्र जाधव यांनी या खटल्यातील पार्श्वभूमी सांगून या खटल्यामधील याचिकाकर्ते आणि गुंतवणूकदार यांची वस्तुस्थिती सांगून न्यायालयाकडे चरेगांवकर यांच्या खटल्यातील सहभागाबाबत तपास करण्यासाठी जास्तीत जास्त पोलीस कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने चरेगांवकर यांना दोन मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.