कोरेगाव : तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत तालुक्यात एकूण ७०.६५ टक्के मतदान झाले. शेवटच्या टप्प्यात अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान काही ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडण्याचे प्रकार घडले. दुपारी दोन वाजेपर्यंत तालुक्यातील १५ मतदान केंद्रांवरील १६ मतदान यंत्रे बदलण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद कुदळे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ संगमेश कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी तातडीने पर्यायी यंत्रे उपलब्ध करून दिल्याने मतदान प्रक्रियेत कोणताही मोठा अडथळा निर्माण झाला नाही.
तालुक्याच्या उत्तर टोकावर असलेल्या सर्कलवाडी येथे कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट दोन्ही एकाच वेळी बंद पडल्याने ती तत्काळ बदलण्यात आली. सर्कलवाडी, निगडी, आसरे, तडवळे संमत कोरेगाव व शिरढोण येथे कंट्रोल युनिट, तर सर्कलवाडी, खामकरवाडी, रणदुल्लाबाद, अनपटवाडी, दुघी, जळगाव, राऊतवाडी, वेळू, आर्वी व चिमणगाव येथे बॅलेट युनिट बंद पडल्याने ती बदलण्यात आली. आर्वी येथील मतदान केंद्रावर दोन बॅलेट युनिट बदलण्याची वेळ आली.
मतदानाच्या टक्केवारीत दिवसभर सातत्याने वाढ होत गेली. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत ७.२३ टक्के, साडेअकरा वाजेपर्यंत २१.८३ टक्के, दुपारी दीड वाजेपर्यंत ३५.८२ टक्के, साडेतीन वाजेपर्यंत ५१.४९ टक्के, तर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ७०.६५ टक्के मतदान झाले.
ग्रामीण भागात काही मतदान केंद्रांबाहेर किरकोळ वादावादीचे प्रकार घडले. कोरेगाव शहरानजीक गोळेवाडी येथे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली, मात्र हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले नाही. संपूर्ण तालुक्यात कोठेही कायदा व सुव्यवस्था याबाबत गुन्हा दाखल झालेला नाही.
कोरेगाव तालुका हा सातारा व माढा लोकसभा मतदारसंघ तसेच कोरेगाव, कराड उत्तर आणि फलटण–कोरेगाव राखीव विधानसभा मतदारसंघात विभागलेला आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची रचना आपोआप झाल्याने तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. संपूर्ण सातारा जिल्ह्यात केवळ कोरेगाव तालुक्यात किंबहुना विधानसभा मतदारसंघात शिवसेना–भाजप युती झाली होती, उर्वरित ठिकाणी हे पक्ष परस्परविरोधात उभे ठाकले होते. तसेच कोरेगाव तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र आल्याने येथे राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत पाहायला मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे विशेष लक्ष लागले होते.
तालुक्यात एकूण १ लाख ९८ हजार ७६८ मतदार असून त्यामध्ये १ लाख ५७६ पुरुष, ९८ हजार १८९ महिला आणि तीन तृतीयपंथी मतदारांचा समावेश होता. त्यापैकी १ लाख ४० हजार ४३६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ७२ हजार ७५८ पुरुष व ६७ हजार ६७८ महिला मतदारांचा समावेश आहे. तृतीयपंथी मतदारांनी यावेळी मतदान केले नाही.
मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या नेतृत्वाखाली कोरेगावचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे पाटील, सुशील भोसले, प्रशांत हुले, महिला पोलीस उपनिरीक्षक दीपिका मुसळे, दीपक शेडगे यांच्यासह पोलीस अधिकारी, अंमलदार, गृह रक्षक दल व राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
सायंकाळी सात वाजल्यापासून कोरेगाव येथील डी. पी. भोसले कॉलेजच्या आवारात तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये मतदान यंत्रे जमा करण्यात आली. सोमवार, दि. ९ फेब्रुवारी रोजी याच आवारातील इनडोअर स्टेडियममध्ये मतमोजणी होणार आहे.
दरम्यान, कोरेगाव तालुक्यात वयोवृद्ध मतदारांचा मतदानाकडे विशेष कल दिसून आला. गोळेवाडी येथील मतदान केंद्रावर १०२ वर्षीय वृद्ध मतदार विष्णू हरी घोरपडे यांनी आपली ९८ वर्षीय पत्नी सावित्री विष्णू घोरपडे यांच्यासमवेत मतदान केले. तसेच ९८ वर्षीय कांताबाई गुलाबराव काळे यांनीही मतदानाचा हक्क बजावला. नवमतदारांपासून ते वयोवृद्ध मतदारांपर्यंत सर्व स्तरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात मतदान करत लोकशाहीप्रती आपली जबाबदारी पार पाडली.