उंब्रज : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील उंब्रजच्या भराव पुलावर उभ्या असलेल्या टेंपोने आज, शुक्रवारी (दि. १८) दुपारी बारा वाजता अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. टेंपोच्या केबिनसह पाठीमागील बाजूस शिसे असलेल्या ॲल्युमिनियम प्लेटवर झाकलेल्या ताडपत्रीनेही पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला.
टेंपो चालकाने टेंपो क्रमांक (एमएच ०४ एल क्यू ६८१६) पुलावर सातारा-कराड मार्गाच्या बाजूला उभा केला होता. अचानक ट्रकने पेट घेतल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. आग लागल्याचे समजताच उंब्रजमधील नागरिक तसेच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवळच असलेल्या एका बँकेतून, पेट्रोल पंपावरून अग्निशामक यंत्र आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्थानिक दोन पाण्याचे टँकर घटनास्थळी बोलावण्यात आले. टँकरच्या पाण्याचा मारा करून अखेर आग पूर्णपणे विझविण्यात आली. मात्र, आग नेमकी कशी लागली हे समजू शकले नाही.
उंब्रजच्या पुलावर टेंपोला आग; वाहतूक विस्कळीत, नागरिक-पोलिसांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
by Team Satara Today | published on : 18 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा