सातारा : वाई येथील औद्योगिक वसाहतीतील ‘अथर्व फॉन्ड्री’ या कंपनीत सोमवारी पहाटे घडलेल्या भीषण अपघातात एका २३ वर्षीय तरुण कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. काम करत असताना अचानक यंत्राच्या पट्ट्यात (कन्व्हेयर बेल्ट) हात अडकून आत ओढला गेल्याने हा प्राणघातक अपघात घडला. या दुर्दैवी घटनेमुळे औद्योगिक परिसरातील कामगारांच्या सुरक्षेचा आणि उपाययोजनांचा मुद्दा पुन्हा एकदा गंभीरपणे ऐरणीवर आला आहे.
जयप्रकाश शिवपती निषाद (वय २३, सध्या रा. अनपट वस्ती, वाई; मूळ रा. मिर्झापूर, उत्तर प्रदेश) असे मृत कामगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयप्रकाश हा अथर्व फॉन्ड्रीतील सँडप्लॅन्ट विभागात कार्यरत होता. सोमवारी पहाटे सुमारे ३:४० च्या सुमारास काम करत असताना त्याचा हात अचानक मशीनच्या बेल्टमध्ये अडकला. बेल्टच्या प्रचंड वेगामुळे तो थेट मशीनच्या आत ओढला गेला आणि अत्यंत गंभीर जखमी झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात येताच सहकाऱ्यांनी तातडीने बेल्ट ढिला करून त्याला बाहेर काढले आणि वाई ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
याबाबत सुरक्षा रक्षक चंद्रकांत सदाशिव खामकर यांनी दिलेल्या माहितीवरून वाई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काळे करत आहेत.
घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रातील कामगारांमधून तीव्र संताप
दरम्यान, या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रातील कामगारांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. कंपन्यांमध्ये सुरक्षेची साधने, मशीनवरील सुरक्षित आवरण आणि आपत्कालीन यंत्रणांची काटेकोर अंमलबजावणी होते का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. केवळ अकस्मात मृत्यूची नोंद न करता, सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाले असल्यास त्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी कामगार संघटनांकडून होत आहे.
यंत्राच्या पट्ट्यात अडकून तरुण कामगाराचा मृत्यू; वाई औद्योगिक वसाहतीतील घटना, कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीरपणे ऐरणीवर
by Team Satara Today | published on : 14 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा