बिष्णोई टोळीतील दोघे गँगस्टर कोल्हापुरात जेरबंद; न्यायालयाच्या पार्किगमध्ये पोलिसांची झडप; दोघांवरही अनेक गंभीर गुन्हे

by Team Satara Today | published on : 29 August 2026


कोल्हापूर : पंजाब, राजस्थान आणि हरियाणासह आंतरराज्य गुन्हेगारी टोळीचा कुविख्यात प्रमुख फरारी आरोपी श्यामलाल गोवर्धनराम पुनिया उर्फ बिष्णोई (वय २९, रा. जमसागर, भियासर, ता. औऊ, जि. फलोदी, राजस्थान) आणि त्याचा साथीदार श्रीराम मांजू उर्फ पाचाराम बिष्णोई (वय २९, रा. भाटेलाई, पुरोहितान, ता. बालेसर, जि. जोधपूर, राजस्थान) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी  नाट्यमयरीत्या ताब्यात घेतले. 

ते न्यायालयीन कामासाठी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात येणार असल्याची माहिती कळताच पोलिसांनी वकिलांचा कोट घालून वेषांतर केले. पार्किंगच्या आवारात लावलेल्या चारचाकी गाडीतून पळून जाताना त्यांना झडप टाकून ताब्यात घेतले. शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास न्यायालयाच्या आवारात हे सुमारे सहा मिनिटे थरार सुरू होता.

अटक केलेल्या या दोघांवर राज्यातील विविध पोलिस ठाण्यांत खून, खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी, दरोडा, खुनासह दरोडा आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे एकूण १७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. किणी टोल नाका येथे २०२०मध्ये पोलिसांवर फायरिंग केल्याप्रकरणीही त्याच्यावर गुन्हा नोंद आहे. पाचाराम बिश्नोई याच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोडा, खुनासह दरोडा, बलात्कार, विनयभंग, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, मारामारी, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे असे २६ गंभीर स्वरूपाचे  २६ गुन्हे दाखल आहेत. मांजू याला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तर पुनिया याला फलोदी, राजस्थान पोलिसांच्या ताब्यात रात्री उशिरा देण्यात आले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्हा बँकेच्या प्रारूप मतदार यादीवर ४९ आक्षेप; २ सप्टेंबरला कोल्हापूर येथे सुनावणी, ७ सप्टेंबरला निकाल
पुढील बातमी
साताऱ्याच्या औद्योगिक क्षेत्रात कूपरकडून नवीन प्रकल्पाची घोषणा; साता-यातील ३०० हून अधिक तरूणांना रोजगाराच्या नव्या संधी

संबंधित बातम्या