सातारा : महाराष्ट्रातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव मिळवून देणे तसेच कौशल्य विकासाला चालना देणे या उद्देशाने केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) अंतर्गत माय भारत (MY Bharat), महाराष्ट्र-गोवा यांच्या माध्यमातून विशेष युवक मोबिलायझेशन उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत राज्यातील अधिकाधिक युवकांनी सहभागी व्हावे यासाठी दि. २० मे २०२६ रोजी महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड, चाकण, पुणे येथे विशेष प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) नोंदणी व मोबिलायझेशन कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
या कॅम्पद्वारे १२ वी उत्तीर्ण तसेच ITI पात्रता धारक युवकांना उद्योग क्षेत्रात इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. १८ ते २५ वर्षे वयोगटातील युवक या उपक्रमासाठी पात्र असून, ५०० पेक्षा अधिक जागा उपलब्ध आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा सुमारे १८ हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
यामुळे युवकांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव, कौशल्य विकास आणि रोजगारक्षमतेत वाढ होण्यास मोठी मदत होणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच भविष्यातील करिअरसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुनिल पवार सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा यांनी केले आहे.