अघोरी नृत्य करण्याची अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी; अंधश्रध्देला अजिबात खतपाणी नाही, त्याकडे करमणूक म्हणूनच पहावे - नगराध्यक्ष अमोल मोहिते यांची भूमिका

by Team Satara Today | published on : 18 February 2026


सातारा  :  सातारा नगरपालिकेच्या वतीने शिवजयंती निमित्त गुरूवारी आयोजित करण्यात आलेला अघोरी नृत्याचा कार्यक्रम वादात सापडला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विज्ञानवादी वारशाला गालबोट लागू नये म्हणून पालिकेने हा कार्यक्रम तातडीने रद्द करावा. खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी पालिकेला तशा सूचना द्याव्यात, अशी मागणी अंनिसने केली आहे. 

शिवजयंतीच्या निमित्ताने सातारा नगरपालिकेने अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. मात्र, अघोरी नृत्याच्या कार्यक्रमामुळे शिवजयंती उत्सवाला गालबोट लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अंनिसने तातडीने एक पत्रक काढून पालिकेने तो कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली आहे. 

अंनिसने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या असंख्य लढाया अमावस्येच्या रात्री सुरू केल्या होत्या. मुहूर्त आणि शकुन याचा विचार न करता त्यांनी स्वतःचे राज्य चालवले. अशा विज्ञानवादी शिवाजी महाराजांच्या आठवणी जागवताना, अवैज्ञानिक कार्यक्रम घेऊन छत्रपतींच्या विज्ञानवादी वारशाला सातारा नगरपालिकेने गालबोट लावू नये. अघोरी नृत्याचा कार्यक्रम तातडीने रद्द करावा, अशी  मागणी अंनिस मार्फत डॉ. हमीद दाभोळकर यांनी केली आहे. 

सातारा जिल्हा हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाचा अत्यंत महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं रोपटं लावलं. त्याची पाळेमुळे  केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये रूजली आहेत. डॉ. दाभोळकरांच्या बलिदानानंतर महाराष्ट्र सरकारने अमानुष प्रथा आणि अघोरी प्रथा विरोधी कायदा केलेला आहे. त्यांच्याच नावाने सातारा पालिका एक पुरस्कार देखील देते. त्याच नगरपालिकेने अशा स्वरूपाचे अघोरी नृत्य आयोजित करणे हे  लांच्छनास्पद असल्याची टीका अंनिसने पत्रकात केली आहे. 

सातारा जिल्ह्याला संत आणि समाजसुधारकांचा मोठा वारसा आहे. तुकाराम महाराजांपासून ते फुले, शाहू, आंबेडकरांपर्यंत सर्वांनी अशा स्वरूपाच्या अघोरी गोष्टी  आणि अंधश्रद्धांवर कोरडे ओढलेले आहेत. त्यामुळे छत्रपतींचे वंशज खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा नगरपालिकेला तो कार्यक्रम रद्द करण्यायाविषयी तातडीने सूचना द्याव्यात, अशी मागणी अंनिसने केली आहे. पत्रकावर उदय चव्हाण, दीपक माने, वंदना माने, भगवान रणदिवे, शंकर कणसे यांच्या सह्या आहेत.

अंधश्रध्देला अजिबात खतपाणी नाही - अमोल मोहिते

अघोरी नृत्य या कार्यक्रमात नृत्याच्या माध्यमातून कोणतीही अंधश्रद्धा पसरेल किंवा त्यास खतपाणी घालावे, अशी आमची अजिबात इच्छा नाही. हा केवळ आणि केवळ करमणुकीचा कार्यक्रम आहे. त्याकडे करमणूक म्हणूनच पहावे. हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर माहिती दिली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शनिवार पेठेतील दोन मिळकती सातारा पालिकेकडून जप्त; बारा लाख 60 हजार 350 रुपयांची वसुली
पुढील बातमी
संपर्कप्रमुख दगडूदादा सपकाळ आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर; संघटनात्मक बांधणीचा घेणार आढावा - जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले यांची माहिती

संबंधित बातम्या