सातारा : सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन्ही जिल्ह्यात भाजपचे एक खासदार, तीन मंत्री आणि आठ आमदार असूनही निवडणुकीच्या शेवटच्या क्षणापर्यंत महायुतीत खदखद आहे. तसेच सलग २० वर्षे राष्ट्रवादीचे बालेकिल्ले असलेल्या दोन्ही जिल्ह्यात त्यांना ‘अस्तित्वा’साठी प्रयत्नांची पराकाष्ठा व धडपड करावी लागतेय.
विधान परिषदेची सातारा-सांगलीची निवडणूक १८ जूनला होणार आहे. मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असतानाही सर्वाधिक बहुमत असतानाही भाजपसह महायुती गॅसवर आहे. सत्तेतील प्रमुख पक्ष असतानाही भाजपच्या नेत्यांना महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषदेचे सदस्य व पंचायत समितीचे सभापती यांना ‘पर्यटनवारी’ घडवावी लागली.
सातारा-सांगली मतदारसंघाची जबाबदारी भाजपचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर वरिष्ठांनी टाकली आहे. त्याचबरोबर खासदार उदयनराजे भोसले हेही स्थानिकच्या निवडणुकीतील सर्व नेत्यांनासोबत प्रचारात सक्रीय आहेत. शिवाय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही महायुतीची समन्वय बैठक घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, राष्ट्रवादी व शिंदेसेनेच्या स्थानिक मंत्र्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. शेवटच्या क्षणापर्यंत भाजपला मित्रपक्षाचे सांत्वन करण्यासाठी वरिष्ठ पातळीपर्यंत कसरत करावी लागतेय.
‘मविआ’ची प्रचार यंत्रणा भूमिगत...
महाविकास आघाडीचे (मविआ) नेते व माजी मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब पाटील, विश्वजित कदम, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, तसेच खासदार विशाल पाटील यांनी काही बैठका घेऊन आणि पत्रकार परिषद घेऊन सदस्यांना आवाहन केले. मात्र, महायुतीचे नेते एकत्रित प्रचारासाठी फिरताना दिसले नाहीत. त्याचवेळी मविआकडून भूमिगत यंत्रणा कार्यरत असल्याची चर्चा महायुतीच्या गोटात आहे. त्यामुळेच दक्षता म्हणून भाजपने दोन्ही जिल्ह्यातील सदस्यांना मतदानापर्यंत अज्ञातस्थळी पाठविले आहे.
महायुतीकडे बहुमत असून धाकधूक
निवडणुकीसाठी दोन्ही जिल्ह्याचे मिळून ८९५ मतदार असून, सर्वाधिक मतदान भाजपकडे ३२५, राष्ट्रवादी (अ. प.) २०५ व शिंदेसेना ११६, असे महायुतीकडे बहुमत ६४६ इतके आहे. मात्र, सातारा व सांगली जिल्हा परिषद सत्ता स्थापनेवेळी राडा होऊन युतीमध्ये धुसफूस झाली. त्यामुळे त्याचा वचपा मित्रपक्षाकडून स्थानिकच्या निवडणुकीत काढला जाण्याची धाकधूक भाजपच्या नेत्यांना वाटत आहे.