सातारा जिल्हा बँकेच्या १२ जागांसाठी उद्या रणधुमाळी; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

by Team Satara Today | published on : 31 October 2026


सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उद्या, रविवारी दि. १ नोव्हेंबर रोजी मतदान होत असून उर्वरित १२ जागांसाठी जिल्ह्यातील राजकीय प्रतिष्ठा आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे.
एकूण २१ जागांपैकी ९ जागा आधीच बिनविरोध झाल्यामुळे उर्वरित १२ जागांवर महायुतीतील घटक पक्षांसह विविध स्थानिक आघाड्या आणि राजकीय गटांचे उमेदवार समोरासमोर ठाकले आहेत. या निवडणुकीत सुरुवातीपासूनच स्थानिक राजकीय समीकरणे, वर्चस्वाची लढाई आणि नेत्यांमधील अंतर्गत स्पर्धा केंद्रस्थानी राहिली आहे. बिनविरोध ठरलेल्या ९ जागांवर प्रक्रिया पूर्ण झाली असून खरेदी-विक्री संघ मतदारसंघातून ना. मकरंद पाटील, कृषी प्रक्रिया मतदारसंघातून आ. डॉ. अतुल भोसले, गृहनिर्माण व दूध मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर, नागरी बँक व पतसंस्था मतदारसंघातून सोमनाथ ऊर्फ काका धुमाळ, सातारा सोसायटी मतदारसंघातून संजयराव सावंत, खटाव सोसायटी मतदारसंघातून नंदकुमार मोरे, वाई सोसायटी मतदारसंघातून सत्यजित वीर यांच्यासह महिला राखीव मतदारसंघातून ऋतुजा पाटील आणि मंगल पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा उर्वरित १२ जागांवर होणाऱ्या चुरशीच्या लढतींकडे लागल्या आहेत. विशेष म्हणजे काही महत्त्वाच्या मतदारसंघांत महायुतीतील घटक पक्षांचे उमेदवारच समोरासमोर उभे ठाकल्याने स्थानिक पातळीवरील पेच अधिक वाढला आहे.
सर्वात जास्त लक्ष लागून राहिलेल्या माण सोसायटी मतदारसंघात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोर त्यांचे बंधू आणि विद्यमान संचालक शेखर गोरे यांनी आव्हान उभे केले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोज पोळ हेही रिंगणात असल्याने येथे प्रतिष्ठेची तिरंगी लढत रंगली आहे. एकाच घरातील दोन बडे राजकीय चेहरे वेगवेगळ्या बाजूने आमनेसामने आल्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या लढतीकडे लागले आहे. खंडाळा सोसायटी मतदारसंघातही चुरस वाढली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय भोसले आणि भाजपचे जिल्हा सरचिटणीस अनिरुद्ध गाढवे यांच्यातील लढतीत ॲड. शामराव गाढवे यांनी अपक्ष म्हणून आव्हान कायम ठेवल्याने येथेही तिरंगी सामना होत आहे. या मतदारसंघातील निकालावर ना. मकरंद पाटील यांची राजकीय पकड पुन्हा एकदा अधोरेखित होणार असल्याने येथील लढतीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
कोरेगाव विकास सेवा सोसायटी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील माने आणि भाजपचे सुनील खत्री यांच्यात सरळ सामना होत असून ही लढत आमदार महेश शिंदे आणि खासदार नितीन पाटील यांच्यातील राजकीय वर्चस्वाचा फैसला करणारी मानली जात आहे. जावली सोसायटी मतदारसंघात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या पाठबळावर रिंगणात उतरलेले ज्ञानदेव रांजणे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे गटाचे विठ्ठल गोळे मैदानात उतरल्याने येथे दोन प्रबळ राजकीय गटांमधील संघर्ष टोकाला पोहोचला आहे.
फलटण सोसायटी मतदारसंघातील लढतही संपूर्ण जिल्ह्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची ठरली आहे. आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यात थेट संघर्ष होत असल्याने फलटणमधील राजकीय वर्चस्वाचा नवा अध्याय या निवडणुकीतून लिहिला जाणार आहे. महाबळेश्वर सोसायटी मतदारसंघात राजेंद्र राजपुरे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर त्यांच्या पत्नी रूपाली राजपुरे यांनी शिवसेनेचे उपसभापती संजय मोरे यांच्याविरोधात थेट लढत निर्माण करत रंगत वाढवली आहे. सोसायटी मतदारसंघांप्रमाणेच राखीव जागांवरही पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. इतर मागास प्रवर्गातून राष्ट्रवादी काँग्रेसचे योगेश फडतरे आणि संदीप पांगणे समोरासमोर आले आहेत, तर भटक्या व विमुक्त जाती मतदारसंघात भाजपचे अर्जुन काळे यांच्याविरोधात सुनील वाघ यांनी आव्हान कायम ठेवल्याने घटक पक्षांमधील अंतर्गत स्पर्धा स्पष्ट झाली आहे.
दरम्यान, मतदानाच्या पूर्वसंध्येला काही उमेदवारांनी मतदान प्रक्रियेतील पारदर्शकतेविषयी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. मतदारांवर दबाव आणण्याचे प्रयत्न, फोडाफोडीचे राजकारण तसेच छुप्या उपकरणांचा वापर होण्याची शक्यता व्यक्त करत मतदान केंद्रांवर पेन, चष्मे, घड्याळे किंवा शर्टाच्या बटनांमध्ये लपविलेल्या गुप्त कॅमेऱ्यांच्या वापरावर कडक निर्बंध आणण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करून संपूर्ण प्रक्रिया निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडण्याची मागणीही लावून धरण्यात आली आहे. सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सत्तेची चावी कोणाच्या हाती जाणार आणि मतदार कोणाच्या पारड्यात आपले वजन टाकणार, याचा फैसला उद्याच्या मतदानानंतर होणार असल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर दोन भागांचा भव्य चित्रपट; भूषण कुमार, ऋषभ शेट्टी आणि संदीप सिंह एकत्र

संबंधित बातम्या