पिंगळा, वासुदेव आणि तुकोबांची गाथा ! खटाव पंचायत समितीचा उन्नत माथा; जिल्हा परिषदेच्या सांस्कृतिक महोत्सव लोककलाकारांच्या चित्ररथ

by Team Satara Today | published on : 12 March 2026


सातारा :  सातारा जिल्हा परिषदेचा क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यामध्ये प्रत्येक तालुक्याने वेगवेगळ्या संकल्पनेवर आधारित चित्ररथ तयार केले होते. या चित्ररथांची फेरी शाहू स्टेडियमवर पार पडली. चित्ररथांमध्ये खटाव पंचायत समितीच्या लोककलाकारांच्या चित्ररथाने सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. गटविकास अधिकारी योगेश कदम यांनी या उपक्रमाला मार्गदर्शन केले. 

पिंगळ्याची भूमिका अत्यंत प्रभावीपणे तुकाराम खाडे यांनी केली. या चित्ररथामध्ये वारकरी, शेतकरी, कडकलक्ष्मी, वासुदेव अशा अनेक लोककलाकार आणि लोक रुढी आणि लोकगीतांसह लोकसंस्कृतीचा संगम साधण्यात आला होता. सर्व कलाकारांनी जीव ओतून काम केले. इवल्याशा विठ्ठल रखमाईने देखील आपल्या भक्तिमय अभिनयाने लक्ष वेधून घेतले.

अंगणवाडी विभागाचे विस्ताराधिकारी यशेन्द्र क्षीरसागर यांनी वारकऱ्याच्या वेशात दर्शन दिले. हातात तुकोबांची गाथा, वारकऱ्यांचा वेश आणि त्याच्यासोबत हातात भगवी पताका अशा वेशात त्यांनी तुकोबांची गाथा अक्षरशः डोक्यावर घेऊन वारकऱ्यांचे भक्तिमय नृत्य केले. इवल्याशा विठ्ठल रखुमाईचे तसेच पिंगळा, वासुदेव, कडकलक्ष्मी ,शेतकरी अशा सर्वच कलाकारांचे गटविकास अधिकारी योगेश कदम यांच्यासह सर्व खाते प्रमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि इतर अधिकाऱ्यांनी तसेच कर्मचारी वर्गाने कौतुक केले. 

भारताची लोकसंस्कृती, लोकधारा, लोकपरंपरा तसेच तुकारामांच्या गाथेच्या निमित्ताने लोकसाहित्य देखील प्रकाशमान केल्याबद्दल खटाव पंचायत समितीच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
डॉ. मृदुला दाढे यांनी उलगडल्या अजरामर गाण्यांमागच्या सुरेल गोष्टी; 'तरी असेल गीत हे ' कार्यक्रमास सातारकर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुढील बातमी
संविधानाच्या स्वप्नातला भारत; पूनम संभाजी माने यांचा राष्ट्रीय निबंध स्पर्धेत खुल्या गटात तृतीय क्रमांक विजेता निबंध

संबंधित बातम्या