सातारा : छत्रपती शिवरायांच्या 395 व्या जयंतीचा पारंपारिक उत्साह सातार्यात वेगवेगळ्या शिवकालीन कार्यक्रमाच्या माध्यमातून अनुभवायला मिळाला. बुधवारी सातारा गांधी मैदान ते पोवई नाका दरम्यान निघालेल्या शाही मिरवणुकीने शिवसेना समितीच्या वतीने आयोजित शिवा महोत्सवाची शानदार सांगता झाली.
पारंपारिक वेशातील मावळे, सजीव चित्ररथ, हत्ती, घोडे, उंट तसेच जय भवानी जय शिवाजी चा आसमंत दणाणून सोडणारा गजर, पारंपारिक थाटामध्ये जल्लोषामध्ये शिवजयंती साजरी झाली. या शाही मिरवणुकीमध्ये राजधानी साताराने शिवकाल अनुभवला. यंदा राजधानी सातारा मध्ये शिवजयंतीचा अनोखा उत्साह पाहायला मिळाला. संपूर्ण जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून शिवजयंती साजरी झाली. सातारा शहरात ठिकठिकाणी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा उभ्या करण्यात आल्या होत्या. त्यांचे होणारे पूजन आणि जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून तसेच परजिल्ह्यातून येणार्या शिवज्योतींचे स्वागत असे उत्साहवर्धक चित्र पाहायला मिळाले.
दिवसभर येथील शिवतीर्थ परिसरामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी शिवभक्तांची गर्दी उसळली होती. सातारा शहरातून जिल्हा प्रशासनाच्या वतीने शिवभक्तीचा तसेच वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून शिव पदयात्रा काढण्यात आली होती. सायंकाळी राजवाडा गांधी मैदान येथून शाही मिरवणूक काढण्यात आली. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे मित्र समूह आणि शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीच्या वतीने या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. खास केरळ वरून आलेल्या कलाकारांनी पारंपारिक वाद्यपूजन आणि वाद्य वृंदाच्या माध्यमातून वेगळाच माहोल तयार केला. राजवाड्यावर सजवलेला हत्ती, घोडे, उंट या माध्यमातून शिवकालाचीच जणू अनुभूती येत होती. याशिवाय झांज, ढोल, लेझीम तसेच मैदानी खेळाची प्रात्यक्षिके अशा माध्यमातून सातारकरांना अस्सल शिवकाळाचा बाज पाहायला मिळाला.
रात्री शिवराज्याभिषेक दिन समिती सदस्यांच्या उपस्थितीमध्ये मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीने मोती चौक, देवी चौक तेथून शेटे चौक मार्गे पोलीस मुख्यालय वरून पोवई नाका अशी ही यात्रा काढण्यात आली. या यात्रेचे भव्य दिव्य स्वरूप सातारकरांनी अनुभवले. या यात्रेची क्षणचित्रे टिपण्यासाठी सातारकरांच्या मोबाईल फ्लॅशचा लखलखाट जाणवत होता. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही मिरवणूक काढण्यात आली होती. त्यामुळे राजपथावरील वाहतूक शाहू चौक, समर्थ सदन मार्गे राजवाडा अशी वळवण्यात आली होती. रात्री आठ वाजता खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते शिवतीर्थावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन महाआरती करण्यात आली. यावेळी बहुसंख्येने शिवभक्त शिवतीर्थावर उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी-जय शिवाजी, हर हर महादेव या घोषणांनी शिवतीर्थ परिसर शहारला. अत्यंत देखण्या आणि शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आलेल्या मिरवणुकीने तीन दिवस चाललेल्या शिव महोत्सवाची सांगता झाली.