खंडाळा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा येथे एका ट्रकने तीन वाहनांना धडक दिली. या अपघातात दोन ट्रक रस्त्याकडेला उलटून, तीन जण जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. 
राष्ट्रीय महामार्गावरून ट्रक बुधवारी (दि. 15) रात्री 10.15 च्या सुमारास पुण्याच्या दिशेने जात असताना, खंडाळा येथे एका हॉटेलजवळ हा अपघात झाला. चालक विनोद रतन जाट याचे ट्रक (आरजे-51-जीए-1065) वरील नियंत्रण सुटल्याने, ट्रकने पुढे असलेल्या दुचाकी व एसटीला धडक दिली. त्यानंतर पुढच्या वळणावर एका ट्रकला (आरजे-27-जीई-3990) पाठीमागून धडक दिली. त्यानंतर दोन्ही ट्रक रस्त्याकडेला उलटले. या अपघातात प्रकाश आनंदराव वाडकर (वय 29, रा. बावधन, ता. वाई), लकीसिंग केसरसिंग रावत (रा. बडलिया, ता. पंचकोट, जि. अजमेर, राजस्थान), विनोद रतन जाट (वय 22, रा. सिकरानी, ता. विजयनगर, जि. बियावर, राजस्थान) हे जखमी झाले आहेत. याबाबत विकास दत्तात्रय गिरी यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालक विनोद जाट याच्यावर खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार अशोक जाधव तपास करत आहेत.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
