सातारा : सातारा नगरपालिकेच्या नगरसेविका मुक्ता लेवे आणि नगरसेवक निशांत पाटील यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या अपात्रता अर्जांवरील सुनावणी मंगळवारी प्रांताधिकारी आशिष बारकुल यांच्या समोर पार पडली. यावेळी दोन्ही नगरसेवकांच्या वतीने लेखी म्हणणे सादर करण्यात आले असून, दोन्ही प्रकरणांच्या पुढील सुनावणीच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.
मुक्ता लेवे यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते अमित शिंदे यांनी जिल्हाधिकार्यांकडे तक्रार दाखल केली आहे. निवडणूक शपथपत्रात मालमत्तेची संपूर्ण माहिती न देणे तसेच शैक्षणिक पात्रतेबाबत चुकीची माहिती सादर केल्याचा आरोप करत त्यांना अपात्र ठरविण्याची मागणी करण्यात आली आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीत लेवे यांच्या वतीने आरोपांवरील सविस्तर भूमिका मांडण्यात आली. त्याची प्रत तक्रारदार अमित शिंदे यांनी मागवून उत्तर सादर करण्यासाठी मुदत मागितल्याने या प्रकरणाची पुढील सुनावणी 16 जुलै रोजी होणार आहे.
दरम्यान, नगरसेवक निशांत पाटील यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी निवडणूक शपथपत्रात मालमत्तेची माहिती लपवल्याची तक्रार दाखल केली आहे. सुनावणीदरम्यान पाटील यांच्या वतीने आरोपांचे खंडन करणारे लेखी म्हणणे सादर करण्यात आले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 28 जुलै रोजी होणार आहे.
या दोन्ही तक्रारींची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी प्रांताधिकारी आशिष बारकुल यांना दिले असून, पुढील सुनावण्यांकडे सातारा पालिकेच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.