गोव्‍यातील नाईट क्‍लबमध्‍ये अग्नितांडव; भीषण आगीत ४ पर्यटकांसह 25 जणांचा होरपळून मृत्यू, - मुख्य महाव्यवस्थापकासह तीन कर्मचाऱ्यांना अटक

by Team Satara Today | published on : 08 December 2025


पणजी : उत्तर गोव्यात गर्दीने भरलेल्या एका नाईटक्लबमध्ये शनिवारीची मध्यरात्री उलटल्‍यानंतर भीषण आग लागली. बर्च बाय रोमियो लेन असे या नाइट क्लबचे नाव असून या दुर्घटनेत 25 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या नाइट क्लबमधील सिलिंडर स्‍फोटामुळे ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्‍यान, या प्रकरणी मुख्य महाव्यवस्थापकासह तीन कर्मचाऱ्यांना अटक करण्‍यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा ‘बर्च बाय रोमियो लेन’ नावाच्या नाइट क्लबमध्ये अचानक सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या २५ मृतांमध्ये ४ पर्यटकांचा समावेश असून १९ नाइट क्लब स्टाफचे कर्मचारी असून ७ जणांची अद्याप ओळख पटलेली नाही. महत्त्वाची बाब म्हणजे सर्वाधिक मृतदेह हे या नाटट क्लबच्या किचनमधून काढण्यात आले आहेत. या घटनेबाबत सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले आहे की, बहुतेक मृत्यू भाजल्यामुळे झाले नसून गुदमरल्यामुळे झाले आहेत. यातील फक्त दोघांचा मृत्यू भाजल्यामुळे झाला आहे.

प्राथमिक चौकशीनुसार या क्लबमध्ये फटाके किंवा सेलिब्रेशनसाठी ठेवलेली रसायने यामुळे आग भडकण्याची शक्यताही वर्तविण्‍यात येत आहे.मात्र, ही आग नेमकी कशी लागली आणि आगीने रौद्ररुप धारण कसे काय केले, याचा सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. अग्निशमन दल आणि पोलिसांच्या पथकांनी रात्रभर बचावकार्य करत अनेक लोकांना वेळेत क्लबच्या बाहेर काढले. धुराचे लोट आणि मोठ्या ज्वाळांमुळे अग्निशमन दलालाही या बचावकार्यात मोठा अडथळा निर्माण झाला होता.

या प्रकरणी क्लब व्यवस्थापक आणि कार्यक्रम आयोजकांविरुद्धही गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. तसेच २०१३ मध्ये क्लबसाठी परवाना जारी करणारे अर्पोरा-नागोआचे सरपंच रोशन रेडकर यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्‍यान, गोव्‍याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. सुरक्षा निकषाचे उल्लंघन, धोकादायक साहित्याची साठवणूक आणि नाइट क्लबमधली सुरक्षा व्यवस्था या सर्व अंगांनी सविस्तर चौकशी सुरू असल्याचे त्‍यांनी सांगितले. या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्‍यांनी सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खोटे वजन दाखवून जरंडेश्वर शुगर मिल्सची फसवणूक; कोरेगाव तालुक्यातील तीन जणांवर गुन्हा
पुढील बातमी
धोम डाव्या कालव्यात बुडून बोपेगावात महिलेचा मृत्यू; घटनेची नोंद भुईज पोलीस ठाण्यात

संबंधित बातम्या