सातारा : गावठी पिस्तूल विक्रीसाठी एमआयडीसी परिसरात फिरत असलेल्या नासीर अब्दुलकरीम बागवान (वय 49, रा. सोमवार पेठ, सातारा) याला सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल, 3 जिवंत काडतुसे आणि मोबाइल असा 65 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरात अवैधरित्या अग्निशस्त्रे बाळगणार्यांवर कारवाई करण्याचा आदेश पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि पोलीस उपअधीक्षक राजीव नवले यांनी सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी दिला होता. त्यानुसार गस्त घालण्याची सूचना मस्के गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिली होती. हे पथक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, एक जण एमआयडीसी परिसरात गावठी पिस्तूल विकायला येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दोन पथके वेगवेळ्या ठिकठिकाणी थांबली होती. त्यावेळी संशयित दत्तनगर येथील कालवा परिसरात फिरताना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन, त्याच्याकडील पिशवीची तपासणी केली असता, त्यात एका छोट्या बॉक्समध्ये गावठी पिस्तूल व तीन काडतुसे ठेवलेली सापडली. हे पिस्तूल विक्रीसाठी आणल्याचे संशयिताने सांगितले.
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, हवालदार सुजीत भोसले, नीलेश यादव, नीलेश जाधव, विक्रम माने, प्रवीण कडव, पोलीस नाईक पंकज मोहिते, संतोष घाडगे, तुषार भोसले, सचिन रिटे, सागर गायकवाड, मच्छिंद्रनाथ माने, आशिकेष डोळस, वैभव माने, सुशांत कदम, सुहास कदम यांनी ही कारवाई केली.