वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी येथील एका पेट्रोल पंपानजीक राहणाऱ्या सुनीता राजेंद्र यादव (वय ४०) यांच्या घरावर पाचजणांनी सशस्त्र दरोडा टाकला. त्यांच्या गळ्याला चाकू लावून त्यांना खिडकीला बांधले. त्यांच्या कानातील कर्णफुलांसह गळ्यातील सोन्याची माळ आणि घरासमोरील आठ शेळ्या अन् सहा लहान-मोठी करडं दरोडेखोरांनी गाडीतून चोरून नेली. ही धक्कादायक घटना रविवारी मध्यरात्री घडली. लंपास केलेल्या मालाची किंमत सुमारे दीड लाख रुपये आहे.
वरकुटे मलवडीपासून तीन किलोमीटरवर असणाऱ्या मल्हारपेठ रस्त्यावर एक पेट्रोल पंप आहे. तेथून पूर्वेला हाकेच्या अंतरावर सुनीता यादव यांचे घर आहे. घरी आई आणि मुलगा दीपक दोघे राहत असून, रात्री जेवण करून सुनीता यादव या घरासमोरील कट्ट्यावर शेळ्यांच्या गोठ्यानजीक झोपल्या होत्या, तर मुलगा शेतीला पाणी देण्यासाठी नजीकच्या शेतात गेला होता. या संधीचा फायदा घेत रात्री दीड ते दोनच्या सुमारास घरामागून पाच दरोडेखोरांनी त्यांच्या घरात प्रवेश केला.
दोघांनी सुनीता यांना जबरदस्तीने घरात नेऊन खिडकीला बांधले, त्यांच्या गळ्याला चाकू लावून कानातील कर्णफुले काढून घेतली. त्यानंतर घरातील कपाट फोडून त्यातील सोन्याच्या मण्यांची माळ घेतली. शेळ्यांच्या गोठ्यातील आठ शेळ्या आणि सहा लहान-मोठी करडं चारचाकी गाडीत टाकून दरोडेखोरांनी पोबारा केला.
या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन त्यांनी तत्काळ ५० हजारांच्या शेळ्या मदत म्हणून देणार असल्याचे जाहीर केले. सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तातडीने दरोडेखाेरांच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथके रवाना केली. बीट अंमलदार रूपाली सोनवणे या अधिक तपास करीत आहेत.