सातारा : येथील जिल्हा परिषद मैदानावर स्मार्ट एक्सपो यांच्यावतीने सुरू असलेल्या छत्रपती कृषी महोत्सव 2025 प्रदर्शनाला केवळ सातारा जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. येत्या रविवार दि. 23 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणाऱ्या या प्रदर्शनाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.
या प्रदर्शनात असलेले विविध प्रकारचे स्टॉल पाहण्यासाठी तसेच अनेक वस्तू साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. अनेक सेंद्रिय प्रकारची खते शेती अवजारे शेती उत्पादने याशिवाय दुचाकी चार चाकी वाहनांनाही अनुभवण्यासाठी येथे विविध नामवंत कंपन्यांनी स्टॉल उभारले असून या स्टॉलवर या नव्या प्रकारच्या मॉडेलच्या वाहनांना पाहण्यासाठी तसेच त्यांची टेस्ट राईड घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
संपूर्ण राज्यातून सादर करण्यात आलेल्या विविध उत्पादनांना एक चांगली बाजारपेठ या छत्रपती कृषी महोत्सव प्रदर्शनात मिळत असल्यामुळे केवळ सातारा ,सांगली ,कोल्हापूर नव्हे तर अगदी परभणी ,नागपूर ,अमरावती वर्धा ,अकोला यासारख्या दूरच्या जिल्ह्यातूनही अनेक विविध प्रकारच्या वस्तूंचे उत्पादक विक्रेते आपले प्रतिनिधी पाठवून या प्रदर्शनात सहभागी झालेले आहेत. गृहपयोगी साहित्य विविध प्रकारची आयुर्वेदिक औषधे विविध प्रकारची सौंदर्यप्रसाधने ,शोभेच्या वस्तू, कटलरी तसेच बिस्किटांचे ,लोणच्यांचे पापडांचे विविध प्रकार येथे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत, याशिवाय या प्रदर्शनातील स्टॉल पाहिल्यानंतर व्हेज आणि नॉनव्हेजचे असंख्य पदार्थ येथे खाद्यपदार्थांच्या स्टॉल द्वारे उभारण्यात आले असून चमचमीत पावभाजी, टेस्टी मिसळ, गरमागरम वडापाव ,मिल्कशेक, कुल्फी विविध प्रकारची नामवंत कंपन्यांचे आईस्क्रीम ,कच्ची दाबेली ,खमंग लोणी थालपीठ तसेच नॉनव्हेज प्रकारातील ही अनेक प्रकारची बिर्याणी ,फ्राईड राईस, चिकन मंचुरियन यासारखे पदार्थ गुलाबी थंडीमध्ये या प्रदर्शनाला भेट देणारे मनसोक्त खाताना दिसून येत आहे. बालगोपाळांसाठी छत्रपती कृषी महोत्सवाच्या मागील बाजूस उभारण्यात आलेली मनोरंजन नगरी अगदी आबाल वृद्धांचे प्रेक्षणीय स्थळ बनली असून या प्रदर्शनाचा लाभ रविवार दि. 23 नोव्हेंबरपर्यंत सर्वांनी अवश्य घ्यावा, असे आवाहन सोमनाथ शेटे यांनी केले आहे.