शेतीपंपांच्या तांब्याच्या केबल चोरीप्रकरणी दोघे अटकेत; वाठार पोलिसांची कामगिरी, तीन गुन्ह्यांची उकल

by Team Satara Today | published on : 10 July 2026


सातारा : वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने घडणार्‍या शेतीपंपांच्या तांब्याच्या केबल चोरीच्या घटनांना आळा घालत वाठार पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली आहे. चोरी करताना दोन आरोपींना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्या चौकशीत मालमत्तेच्या चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. या कारवाईत सहा शेतकर्‍यांच्या मालकीच्या सुमारे 83 हजार रुपये किमतीच्या 960 फूट तांब्याच्या केबल जप्त करण्यात आल्या आहेत.

देऊर (ता. कोरेगाव) येथील मळवी शिवारात अजित धनसिंग कदम यांच्या विहिरीवरील सुमारे 70 फूट तांब्याची केबल 2 जुलै 2026 रोजी चोरी करण्याचा प्रयत्न सुरू असताना ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य, पोलीस पाटील आणि वाठार पोलिसांनी तत्परता दाखवत दोन्ही आरोपींना रंगेहात ताब्यात घेतले.

अटक केलेल्या आरोपींकडे सखोल चौकशी करण्यात आल्यानंतर त्यांनी देऊर व तळीये परिसरातील धरणालगतच्या तसेच विविध विहिरींवरील पाणी उपसा पंपांच्या तांब्याच्या केबल चोरी केल्याची कबुली दिली. या चौकशीतून वाठार पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मालमत्तेच्या चोरीचे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले असून चोरीस गेलेल्या 960 फूट तांब्याच्या केबल जप्त करण्यात पोलिसांना यश आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. तपासात पोलीस उपनिरीक्षक गहिनीनाथ सातव, नितीन भोसले तसेच वाठार पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

या कारवाईमुळे परिसरातील शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण असून मालमत्तेच्या चोरीसंदर्भात कोणतीही संशयास्पद हालचाल अथवा माहिती असल्यास ती तातडीने आणि गोपनीय पद्धतीने पोलिसांना कळवावी, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी नागरिकांना केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात राष्ट्रवादीचा एल्गार; सातार्‍यात महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
पुढील बातमी
मतदार पुनरिक्षण फॉर्म भरण्यास दिरंगाई नको - मुख्याधिकारी विनोद जळक, २९ जुलैपर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

संबंधित बातम्या