आशा व गटप्रवर्तक युनियनचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन; प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले

by Team Satara Today | published on : 12 February 2026


सातारा :  सिटू संलग्न सातारा जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील आशा व गटप्रवर्तक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आशा व गटप्रवर्तकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. आशा या मोबदल्यावर कार्यरत कर्मचारी असून कोणत्याही कारणास्तव त्यांच्या मोबदल्यात कपात करू नये, अशी ठाम मागणी करण्यात आली. तसेच आशांना दिवसभर बैठकीसाठी थांबविण्याची सक्ती करू नये, गुगल लोकेशन फोटो अपलोड करण्याची अट रद्द करावी, अशीही मागणी करण्यात आली.

फुमात्रा अॅप सुरू करण्यापूर्वी दर्जेदार मोबाईल उपलब्ध करून द्यावा, अॅपमधील त्रुटी दूर करून योग्य प्रशिक्षणानंतरच अंमलबजावणी करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच ज्या आशांनी ‘निश्चय आयडी’ काढले आहेत, त्यांना त्याबाबतचा मोबदला तातडीने देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

यापूर्वी आरोग्य सहसंचालक राजेंद्र भालेराव यांच्यासोबत मुंबई येथील आरोग्य भवनात शिष्टमंडळाची बैठक झाली असून काही मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासन मिळाल्याचे संघटनेच्या राज्य अध्यक्षा कॉ. आनंदी अवघडे यांनी सांगितले. मात्र जिल्हास्तरावरील प्रश्न तातडीने निकाली निघावेत, यासाठी आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आंदोलनादरम्यान प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भारत-पाकिस्तान सामना रद्द करा - हिंदू जनजागृती समितीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
पुढील बातमी
कर्मचारी संघटनांची साताऱ्यात घोषणाबाजी; समन्वय समितीचे प्रशासनाला निवेदन, कामगार व शेतकरी कायद्याचा निषेध

संबंधित बातम्या