मतदान केंद्रावर कर्तव्य बजावणीसाठी जाणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या शाळांना 6 फेब्रुवारी रोजी सुट्टी - जिल्हाधिकारी संतोष पाटील

by Team Satara Today | published on : 05 February 2026


सातारा  :  सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद व ११ पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणुकीचे मतदान शनिवार दि. ७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. मतदान केंद्रावर मतदान कर्तव्य बजावणीकरीता मतदान पथकांची नियुक्ती केलेली असून त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

मतदान कर्तव्याकरीता नियुक्त केलेले मतदान पथक यांना शुक्रवार दि.६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजल्यापासून संबंधित तालुका स्तरावरुन मतदान साहित्य वाटप करण्यात येणार आहे.  सदर साहित्य घेवून मतदान पथक हे त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर दिनांक ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजलेपासून पोहोचण्यास सुरुवात होणार आहे.  त्यामुळे ज्या प्राथमिक व माध्यमिक शाळेमधील कार्यरत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक कामाकरिता नियुक्ती केली आहे, अशा शाळांना शुक्रवार, दि. ६ फेब्रुवारी रोजी सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. तसेच ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक कामाकरिता नियुक्ती केलेली नाही, त्या शाळा शुक्रवार दिनांक ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते ११.३० या वेळेत भरविण्याचे निर्देश सातारा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले आहेत.

तसेच दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजल्यापासून सर्व मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरु होणार असल्यामुळे तसेच उद्योग, उर्जा कामगार व खनिकर्म विभाग यांच्याकडील दिनांक ३० जानेवारीच्या परिपत्रकानुसार शनिवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने 7 फेब्रुवारी रोजी सुट्टी
पुढील बातमी
राज्य निवडणूक आयुक्तांची ‘राष्ट्रीय परिषद’ २४ फेब्रुवारीला नवी दिल्लीत; परिषदेचे अध्यक्षस्थान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार भूषवणार

संबंधित बातम्या