सातारा : महसूल विभागाशी संबंधीत सेवा तळागाळातील लोकांपर्यत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी अनेक प्रभावी धोरणात्मक निर्णय शासनामार्फत घेण्यात आले आहेत. महसूल विभागामधील सदर सुधारणांचा लाभ सर्व सामान्य जनतेला करुन देणेसाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान 18 फेब्रुवारी, 2026 ते 15 मे, 2026 या कालावधीत राबविण्यात येणार आहे, तरी याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
अभियानामध्ये प्रामुख्याने पुढीलप्रमाणे सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. प्रलंबित फेरफार निकाली काढणे, अभिलेख दुरुस्ती, सर्व प्रकारचे दाखले वाटप करणे व इतर सेवा, अकृषक तरतुदीसंदर्भातील सुधारणांबाबत नागरिकांना मार्गदर्शन करुन जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत लाभ होईल यादृष्टीने कार्यवाही करणे, भूसंपादन केलेल्या व अकृषक परवानगी दिलेल्या प्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करुन गाव दप्तर अद्ययावत, Ease of Doing Business सुधारणा व नागरी सुविधा उपलब्ध करुन देणे, ई-मोजणी, अॅग्रीस्टॅक, पीएम किसान बाबत जास्तीत जास्त लाभार्थी यांना लाभ होण्याच्या दृष्टीने नियोजन करुन कार्यवाही करणेत येणार आहे.
तरी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र. 1 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या शिबीरांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होवून पात्र लाभार्थी यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. तसेच ग्रामीण व नागरी भागातील विद्यार्थी यांनी सदर शिबीरांमध्ये त्यांना आवश्यक असणाऱ्या दाखले उपलब्ध करुन घ्यावेत, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले आहे.