सातारा : सज्जनगड येथे एका हॉटेल कामगाराने सुमारे २०० फूट उंच कड्यावरून दरीत उडी घेतल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, माची पेठ येथील संदेश शंकर पडियार (वय ३४) हे सातारा शहरातील एका हॉटेलमध्ये कामगार म्हणून कार्यरत होते. आज सकाळी ते एकटेच सज्जनगडावर आले. गडावर पोहोचल्यानंतर त्यांनी गडाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या धाब्याचा मारुती मंदिराच्या दक्षिणेकडील कड्याकडे जाऊन कोणालाही न कळता दरीत उडी घेतली.
ही घटना परिसरातील पर्यटकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ सातारा तालुका पोलीस स्टेशन येथे माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिका बोलावली. स्थानिकांच्या मदतीने सुमारे २०० फूट खोल दरीत उतरून संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचण्यात आले. मात्र, उंचावरून पडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
यावेळी पोलीस हवालदार कर्णे, एएसआय वायदंडे तसेच होमगार्ड पलटण नायक शिंदे, सावंत व चव्हाण यांनी मिळून संबंधित व्यक्तीचा मृतदेह दरीतून बाहेर काढत रस्त्यापर्यंत आणला. त्यानंतर बलून स्ट्रेचरच्या सहाय्याने मृतदेह वाहनापर्यंत हलवण्यात आला. दरम्यान, कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार संदेश पडियार हे गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.