कराडजवळ भीषण अपघात; अंबाबाई दर्शनाहून परतणाऱ्या चार मित्रांचा मृत्यू, तिघे गंभीर

by Team Satara Today | published on : 21 October 2026


​सातारा : कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेऊन गावी परतत असताना कराडजवळ झालेल्या भीषण अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जण गंभीर जखमी झाले. मंगळवारी (२० ऑक्टोबर) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पुणे-बंगळुरू महामार्गावरील कराडजवळील नवीन सहापदरी उड्डाणपूलावर हा अपघात घडला. सर्व तरुण साताऱ्यातील खटाव तालुक्यातील कातरखटाव गावचे रहिवासी आहेत.
​तेजस देशमुख (वय २५), सागर निंबाळकर (वय २३), सुयश चिंचकर (वय २०) आणि रोहित धोत्रे (वय २१) अशी अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. तर ऋतुराज दुबळे (वय २१), शंतनू शिंगाडे (वय २०) आणि अमन तांबोळी (वय २३) असे जखमी झाले असून त्यांच्यावर कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
​कातरखटाव गावातील हे तरुण दसऱ्यानिमित्ताने स्कॉर्पिओ गाडीने कोल्हापूर येथील महालक्ष्मीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन रात्रीच्या सुमारास ते गावी परतत असताना, कराड शहराजवळ नवीन सहापदरी उड्डाणपूलावर त्यांची गाडी एका ट्रकला मागून धडकली. हा अपघात इतका भीषण होता की स्कॉर्पिओ गाडीचा अक्षरशः चुराडा झाला. कराडजवळील नव्या उड्डाणपूलावरील हा पहिलाच अत्यंत भीषण अपघात ठरला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. या दुर्दैवी घटनेमुळे कातरखटाव गावावर शोककळा पसरली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्ह्यातील दहा तालुक्यांत वन्यजीवांसाठी ४०० वनराई बंधारे उभारले; वन विभागाचा पुढाकार,वन्यप्राण्यांसाठी उपाययोजना हाती

संबंधित बातम्या